मोप विमानतळास भाऊसाहेबांचे नाव द्या: म.गो. गट समिती

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

गोमंतकीय जनतेच्या हृदयसिंहासनात स्थान मिळवणाऱ्या स्व. भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव मोप येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास देऊन त्यांचा सन्मान करावा असे म्हापसा म.गो. गट समितीच्या बैठकीत एक मताने ठराव घेण्यात आला.

 म्हापसा : गोमंतकीय जनतेसाठी सर्वोत्तम कार्य करणारे, बहुजन समाजाच्या विकासासाठी कूळ मुंडकारांच्या उत्कर्षासाठी कायदे करणारे गोमंतकीय जनतेच्या हृदयसिंहासनात स्थान मिळवणाऱ्या स्व. भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव मोप येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास देऊन त्यांचा सन्मान करावा असे म्हापसा म.गो. गट समितीच्या बैठकीत एक मताने ठराव घेण्यात आला.

 म्हापसा येथील प्रीतीभोजन कक्षात संपन्न झालेल्या म. गो. गट समितीच्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी अॅड. वामन पंडित होते. त्यांच्या समवेत सचिन किटलेकर, नंदू धावसकर, देश किनळेकर, सुरेंद्र शेट्ये, एकनाथ म्हापसेकर व इतर म. गो.चे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अॅड. वामन पंडित म्हणाले की म्हादई ही जीवनदायिनी असून गोमंतकीयांचे भवितव्य असलेल्या नदीचा प्रश्न रेंगाळत आहे. मेळावलीत गेले कित्येक दिवस आंदोलन चालू आहे. या ज्वलंत प्रश्नावर फोकस करणे महत्वाचे आहे.

म.गो. पक्षाच्या राजवटीत बहुजन समाज होते. त्यांचे प्रश्न सुटत होते अन्यतः भाऊसाहेब ते सोडवत होते. पण आज भाजपाच्या राज्यात आंदोलने करूनही प्रश्न सुटत नाहीत. म्हणूनच म.गो.पक्षाने आता चळवळ उभारायला हवी त्यासाठी मध्यवर्ती समितीने आमच्याशी संपर्क साधून हे काम आमच्याकडून करून घ्यायला हवे, असे अॅड. पंडित म्हणाले. नंदू धावसकर म्हणाले जगावर कोरोनाचे संकट असताना गोव्यात सनबर्नसारखे कार्यक्रम करण्याचा घाट घातला जात आहे. मंदिरे आणि प्रार्थना स्थळे बंद करून धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.

तर सुरेंद्र शेट्ये म्हणाले गोमंतकीयांची दुकानें मारवाड्यानी हडप केली आहे. उपमुख्यमंत्री बाबू अाजगांवकर म.गो.च्या तिकिटावर निवडून आले आणि पलटी मारून भाजपात गेले. अश्या लोकांना जनतेने धडा शिकवायला हवा.  एकनाथ म्हापसेकर म्हणाले की, म.गो. च्या कार्यकारिणीची दखल कोणी घेत नाही. जे जे म.गो. सोडून गेले त्यांचे राजकीय भविष्य संपले आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी. आता म.गो. पक्षाला सक्रिय व्हावे लागेल. पालिका निवडणुकीत म. गो.चे उमेदवार उतरावावेत अशी मागणी सचिन किटलेकर यांनी यावेळी बोलताना केली.

संबंधित बातम्या