गोव्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ई-शैक्षणिक उपक्रमाची सुरवात 

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथील सचिवालय संकुलात गणित, ईव्हीएस आणि विज्ञान या विषयातील ई-शैक्षणिक आशय (टीव्हीच्या माध्यमातून सदर विषयाचे धडे)  हे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथील सचिवालय संकुलात गणित, ईव्हीएस आणि विज्ञान या विषयातील ई-शैक्षणिक आशय (टीव्हीच्या माध्यमातून सदर विषयाचे धडे)  हे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केले. शिक्षण संचालनालय, एससीईआरटी आणि गोवा समग्र शिक्षा यांनी एकत्रित येऊन सध्याच्या या आव्हानात्मक परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचण्यास बाधा उत्पन्न होते त्यांच्यासाठी  विविध उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गोवा दूरदर्शनमध्ये दुसरा टर्म आणि स्थानिक केबल वाहिन्यांमधून प्राथमिक इयत्तेसाठी ईव्हीएस आणि गणित तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये टेलिव्हिजनच्या माध्यमाद्वारे शिक्षण दिले जाईल.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीचे हे प्रसारण 27 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 पर्यंत प्रसारण चालू राहणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. आपल्या मुलांच्या मनात सतत अशा उपक्रमांची जागृती करीत राहणे याबाबत पालकांनी विशेष भूमिका बजवावी, असे ते म्हणाले. कथा, चित्रे, कार्य इत्यादींचा समावेश करून सदर उपक्रमाची रचना केलेली आहे. तसेच यंदाचे शैक्षणिक वर्ष एक आव्हानात्मक वर्ष असल्याने ज्या विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण सुरळितरित्या पोचत नव्हते त्यांच्यासाठी शिक्षकांच्या मदतीने संप्रेषणाच्या विविध पद्धतींद्वारे सरकारने त्यांच्या पर्यंत पोचण्याचा सर्व तर्‍हेने प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. 

याशिवाय, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फनमाईंडस लर्निंग टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या सीएसआर पाटर्नर, एस युनायडेट ब्रीवेरिज प्रायव्हेट लिमिटेड, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, एससीआरटी संचालक, स्टेट प्रॉजेक्ट संचालक- गोवा सम्रग शिक्षा आणि टीव्ही वाहिनीवर शैक्षणिक ई-सामग्री तयार करणे, क्युरेटिंग आणि प्रसारण करण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या शैक्षणिक आणि तांत्रिक गटांच्या सर्मपित कार्याचे कौतुक केले.

संबंधित बातम्या