'राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली'

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. सावंत, यांच्याकडे गृहमंत्री पदाचाही ताबा आहे, ते राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी तातडीने आपला राजीनामा द्यायला हवा

पणजी: आम आदमी पक्षाचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी राज्यातील कायदा, सुव्यवस्था हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याचे मत व्यक्त करताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

याविषयी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, डॉ. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री या नात्याने लाभलेल्या नेतृत्वाखाली राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. सावंत, यांच्याकडे गृहमंत्री पदाचाही ताबा आहे, ते राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी तातडीने आपला राजीनामा द्यायला हवा

पुढे ते म्हणाले, गोव्यासारख्या छोट्याश्या आपल्या राज्यात कायदा सुव्यस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे. अमली पदार्थ व्यवहार, रेव्ह पार्ट्या, बेटिंग आणि दिवसाढवळ्या होणारे खून यासारखे प्रकार रोजचेच होत असल्याने ही बाब निश्चितच चिंताजनक आहे . सावंत अर्धवेळ गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यासारखे कार्यरत असून त्यांना वाढत्या गुन्हेगारीची चिंता नाही. दीड महिन्यापूर्वी मडगावमध्ये एका सराफी दुकानमालकाचा भर दिवसा सुरा खुपसून खून करण्यात आला.

शिरदोन समुद्रकिनाऱ्यावर एका दोन वर्षांच्या कोवळ्या बालिकेचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत, २० दिवसांपूर्वी सापडला. तोर्डा गावाजवळ एका व्यक्तीला २ दिवसांपूर्वी जिवंत जाळून मारण्यात आले आणि पोलिसांना या प्रकरणाची जलद चौकशी करून गुन्हेगारांना अटक करणे जमलेले नाही. 

संबंधित बातम्या