संपादकाच्या संगतीत; उत्साहमूर्ती

बोरकर यांच्या वडिलांचे कारवारमध्ये दुसऱ्या पुत्राकडे निधन झाले. बोरकर सकाळी गेले आणि दहनविधी वगैरे आटोपताच दमलेभागले संध्याकाळी परतले ते थेट कार्यालयात. जातिवंत पत्रकार वैयक्तिक दु:ख कवटाळून बसू शकत नाही, याचे हे मूर्तिमंत उदाहरण.
Laxmidas Borkar
Laxmidas BorkarDainik Gomantak

(सुरेश वाळवे)

अशें किदें करता?’

लक्ष्मीदास बोरकर सर संतापले म्हणजे अशी तीन शब्दांत प्रतिक्रिया व्यक्तवत. नपेक्षा त्यांना कधी कुणी चिडलेले पाहिले नसेल.

द्वा. भ. कर्णिक (५ वर्षे) आणि शांताराम बोकील (२ वर्षे) यांच्यानंतर बोरकर यांनी १६ सप्टेंबर १९७७ रोजी ‘नवप्रभा’चे संपादक म्हणून कार्यालयात प्रवेश केला, तोच मुळी उत्साहाने फसफसत. गेल्या लेखात वर्णिलेले दत्ता सराफ जवळजवळ सहा फूट उंच तर बोरकर पावणेसहा फुटांच्या आसपास.

शिडशिडीत अंगकाठी आणि सतत अस्वस्थ, चुळबुळ करणारे.ऊर्जेने संपन्न. दुर्मुखलेले, अंग गाळलेले, हताश, निराश बोरकर आम्ही सात वर्षांत कधी पाहिले नाहीत. टापटीप कपडे, नीटनेटकी राहणी आणि चाल झपाझप. कर्णिक, बोकील यांच्या काळात दैनिकाचा झोत राष्ट्रीय बातम्यांना प्राधान्य देण्याकडे होता; बोरकर यांनी तो रातोरात बदलून स्थानिक विषयांना महत्त्व देणे सुरू केले आणि खपाच्या दृष्टीने त्याचा परिणामही दिसू लागला.

बोरकर वीसेक वर्षे ‘लोकसत्ते’सारख्या मोठ्या पेपरमध्ये होते. विद्याधर गोखल्यांचे जानी दोस्त. आज पेपरचा ले आउट म्हणजेच गेटअप् कसा करायचा, ते म्हणे घरी ठरवून यायचे. कर्णिक, बोकील यांच्या सात वर्षांच्या काळात सजावटीकडे क्वचितच कुणी लक्ष पुरवले असेल. बोरकर यांनी मात्र कटाक्षाने त्याकडे ध्यान दिले. अंतरंगाप्रमाणे बाह्यरूपही देखणे असले पाहिजे, यावर त्यांचा भर होता. त्यांच्यामुळे ‘नवप्रभा’ने कात टाकली, असे म्हणायला हरकत नाही.

अग्रलेखांव्यतिरिक्त ‘मांडवीच्या तीरावरून’ हे स्फुट बोरकर लिहायचे. संपादकीयाचा विषय गंभीर असेल तर त्या सदरात ते हलका-फुलका परामर्ष घेत. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे बोरकर यांनी दैनिक लोकाभिमुख बनवले. त्यासाठी गावोगाव वाचक मेळावे घेतले आणि त्यातून पत्रलेखक तयार केले.

साळगावचे आमदार केदार नाईक यांचे वडील जयप्रकाश हे तेव्हा ‘नवप्रभा’मध्ये उपसंपादक होते. माणूस उत्तम लेखणी असलेला. शृंगारकथा लिहाव्यात तर त्या जेपीनेच. त्याला आणखी काही वर्षे आयुष्य लाभते तर रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांच्याप्रमाणे शेकडो कादंबऱ्या जेपीने लिहिल्या असत्या.

मुद्दा हा की, जेपीला घेऊन बोरकर मेळाव्याला जात. तेथे लोक स्थानिक विषयांना वाचा फोडत. जेपी मग कार्यालयात परतल्यानंतर विविध वाचकांच्या नावाने त्यांचे पत्रात रूपांतर करीत असे. अशा प्रकारे ‘जनता उवाच’ आघाडी बोरकरांनी निर्माण केली. पुढे माझ्या काळातही अधिकाधिक पत्रे छापण्याचा दृष्टिकोन ठेवला.

दैनिकाचे ते एक महत्त्वाचे अंग असते, हे अजून काहींच्या ध्यानी आलेले नाही, याचे आश्‍चर्य वाटते. बोरकर यांचे पत्रकार म्हणून कार्य महत्त्वाचे होतेच; पण ते एक स्वातंत्र्यसैनिकही होते, हे अनेकांना माहीत नसेल. समाजवादी विचारसरणीच्या बोरकरांना पोर्तुगीज सरकारने पाच वेळा स्थानबद्ध केले होते.

स्वातंत्र्य चळवळीत सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा प्रसंग त्यांच्या जीवनात घडला होता. तरी त्याचा फार गवगवा त्यांनी कधी केला नाही. १८ जून १९४६ रोजी मडगाव येथे डॉ. राममनोहर लोहिया यांनी जे रणशिंग फुंकले, त्याचे बोरकर केवळ एक मूक साक्षीदारच नव्हे तर प्रत्यक्ष सहभागीदारही होते.

‘हॉटेल रिपुब्लिका’मधून सभास्थानापर्यंत घोडागाडीतून लोहियांना आणण्याची जबाबदारी बोरकर यांनी स्वीकारली होती. लोहियांप्रमाणेच पुरुषोत्तम काकोडकर, बोरकर यांनाही त्यावेळी स्थानबद्ध करण्यात आले होते.

बोरकर यांची कर्तव्यनिष्ठा वाखाणण्याजोगी होती. हल्ली पंतप्रधानांच्या मातोश्री हिराबा यांचे निधन झाले; मोदीजी सकाळीसकाळी अहमदाबादला गेले, मातोश्रींच्या पार्थिवास खांदा दिला, अंत्यसंस्कार आटोपताच दिल्लीला परतून कामाला लागले याचे कोण कौतुक झाले! बोरकर यांच्या वडिलांचे कारवारमध्ये दुसऱ्या पुत्राकडे निधन झाले. बोरकर सकाळी गेले आणि दहनविधी वगैरे आटोपताच दमलेभागले संध्याकाळी परतले ते थेट कार्यालयात. जातिवंत पत्रकार वैयक्तिक दु:ख कवटाळून बसू शकत नाही, याचे हे मूर्तिमंत उदाहरण.

गेल्या लेखात सराफ यांनी रायबंदर होडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांसाठी निधी कसा गोळा केला होता, हे लिहिले होते. नावाडी राजाराम बांदोडकरने दहाबारा जणींना वाचवले होते, तो पुढे आजारी पडून अन्नाला मोताद झाला, तेव्हा ‘नवप्रभे’ने त्याच्यासाठी निधी उभारला. क्रीडा संपादक विजय गाड यांच्याकडे त्यासंदर्भातील जबाबदारी दिली.

पण एकदा आकडा प्रसिद्ध करताना छोटीशी चूक घडली तेव्हा निधीत हेराफेरी झाल्याची आवई उठवली गेली. प्रतिस्पर्धी दैनिकाने तिला भडक स्वरूप दिल्याने गाड यांना नाहक मनस्ताप सोसावा लागला. मालक वसंतराव धेंपे यांनी या प्रकरणाची गंभीरपणाने दखल घेत अंतर्गत हिशेब तपासणी करवली, तेव्हा सारे काही सुरळीत व ठीकठाक असल्याचे आढळले. मात्र निधी आटला तो आटलाच. या प्रकरणामुळे बोरकर आणि नारायण आठवले यांचे संबंध न सांधण्याइतके दुरावले.

बोरकर हा अंतरबाह्य पारदर्शी माणूस. नाकासमोर चालणारा. ‘गोंय’ आणि ‘गोंयकारपण’ यावर मनापासून प्रेम करणारा. वसंत नेवरेकर यांची परराष्ट्र खात्यात मोठ्या हुद्द्यावर नेमणूक झाली, तेव्हा ती बातमी, उपसंपादकाने ‘दुसरीकडे आधीच प्रसिद्ध झाली’ म्हणत नाकारली तेव्हा बोरकरांनी त्या अभिमानास्पद नेमणुकीचे अग्रलेख लिहून स्वागत केले. कोत्या मनोवृत्तीला दिलेली ती चपराक होती. बोरकरांनीच मला पत्रकार म्हणून घडवले यासाठी मी त्यांचा नेहमी कृतज्ञ राहीन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com