डिचोलीत बायोमिथेशन प्रकल्पाची पायाभरणी 

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

सुमारे सव्वा दोन कोटी खर्चून पालिकेच्या लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

डिचोली: कचऱ्यापासून एकाचवेळी वीज, गॅससह खत निर्मिती करणारा  'बायो-मिथेशन'(Bio-methanation) हा महत्वाकांक्षी प्रकल्प डिचोलीत (Dicholi) उभारण्यात येत असून, शुक्रवारी सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. सुमारे सव्वा दोन कोटी खर्चून पालिकेच्या लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मेलहॅम एन्व्हायरमेंट' (Melham Environment)  या कंपनीतर्फे या प्रकल्पाची बांधणी करण्यात येणार आहे. कचरा व्यवस्थापनात (waste management) 'नंबर वन'असलेल्या डिचोली पालिकेतर्फे  बायो-मितथेशन प्रकल्प उभारण्यात येत असल्याबद्दल सभापती पाटणेकर यांनी समाधान व्यक्त केले.

पायाभरणी सोहळ्यास नगराध्यक्ष पुंडलिक फळारी, उपनगराध्यक्षा तनुजा गावकर, नगरसेवक सतिश गावकर, निलेश टोपले, विजयकुमार नाटेकर, सुदन गोवेकर, रियाज बेग, अनिकेत चणेकर, पांडुरंग कोरगावकर,  दीपा शेणवी शिरगावकर, ऍड. अपर्णा फोगेरी, ऍड. रंजना वायंगणकर आणि दीपा पळ तसेच पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, अभियंता राजेश फडते,  मेलहॅम कंपनीचे प्रतिनिधी गौरव पोकळे,  आदी उपस्थित होते.  केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगातर्फे हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्याचा आर्थिक भार राज्य सरकार उचलणार आहे.

Goa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर

सुमारे 650 चौरस मीटर जागेत पुणे येथील 'मेल्हम इकोज एन्व्हायरमेंट' या कंपनीतर्फे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या 'बायोमॅथानेशन' प्रकल्पातून तिहेरी फायदा होणार आहे. डीजी उपकरणात कचरा टाकल्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन कान्हव्हर्टमधून गॅस आणि वीज निर्मिती होणार आहे. तर  प्रक्रियेनंतर शिल्लक राहणाऱ्या टाकाऊ कचऱ्यापासून खत तयार होणार आहे. तयार होणारा गॅस  कचरा प्रक्रिया प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना चहा, स्वयंपाक आदी पदार्थ शिजवण्यासाठी वापरता येणार आहे. प्रकल्पातून दरदिवशी 300 युनिट वीज निर्मिती होणार आहे.  तयार होणारी वीज प्रकल्पासाठी तसेच पदपथ दिवे प्रकाशमय करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या खर्चात बचत होणार असून, गॅस आणि खत विक्रीतून आर्थिक कमाईही होणार आहे. 

संबंधित बातम्या