उपोषणापूर्वीच नेता पोलिसांच्या ताब्यात!

Baburao Rivankar
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

‘कंटेन्मेंट झोन’मधून लोकांना मुक्त करा किंवा विविध मागण्यांची पूर्तता करा अशी हाक देऊन सोमवारी मांगोरहिल येथील नगरसेवक सैफुल्ला खान आणि रहिवासी बेमुदत उपोषणाला बसणार होते, परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी श्री. खान यांना ताब्यात घेतल्याने उपोषण छेडण्याची घोषणा अखेर फुसका बार ठरली.

मुरगाव
मांगोरहिल ‘कंटेन्मेंट झोन’मधील लोक गेल्या दोन महिन्यांपासून बंदिस्त आहेत. त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लोक बरेच मेटाकुटीला आले असून त्यांना झोनमधून मुक्त करावे अन्यथा लोकांच्या सर्व गरजा शासनाने पूर्ण कराव्यात अशी लेखी मागणी ‘कंटेन्मेंट झोन’मधील लोकांच्यावतीने नगरसेवक सैफुल्ला खान यांनी प्रशासनासमोर ठेवल्या होत्या. जर या मागण्या मान्य होत नसतील, तर आज सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी आपल्या निवेदनातून दिला होता.
तथापि, शासनाने कोणत्याच मागण्या मान्य न केल्याने पूर्वघोषीत कार्यक्रमानुसार सैफुल्ला खान आणि छोटा मांगोर येथील शेकडो रहिवासी उपोषणाला बसण्यासाठी रस्त्यावर उतरले. यात पुरुषांबरोबर महिलांचीही मोठी संख्या होती. परंतु ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये १४४ कलम लागू केलेले असताना लोकांचा जमाव करून उपोषण करणे कायदाविरोधी आहे. हे मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी सैफुल्ला खान यांना सांगितले, तरीही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांना वास्को पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्थानकावर आणले.
आमच्या मागण्या मान्य झाल्याविना आपण मागे हटणार नाही, आपल्याला अटक करून तुरुंगात डांबले तरी त्याची आपल्याला पर्वा नाही, असे श्री. खान यांनी यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. देसाई यांना ठणकावून सांगितले.
‘कंटेनमेंट झोन’मधील लोकांची कोविड तपासणी केली जात नाही, रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात नाहीत, विविध कल्याणकारी योजनेतून लोकांना सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत मिळत नाही, कर्जदारांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा लागला आहे, बांधकाम मजुरांना सहा हजार रुपयांची मदत मिळाली नाही या सर्व समस्यांचे निवारण शासनाने करावे, अशी मागणी श्री. खान यांनी उपजिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्या समोर ठेवली. याव्यतिरिक्त रहिवाशांचे वीज, पाणी बिल माफ करावे, मोफत गॅस सिलिंडर द्यावेत या मागण्याही त्यांनी मांडल्या. तथापि, या क्षणी कोणत्याच मागण्या मान्य होऊ शकत नाहीत, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मांगोरहिलमधील रहिवाशांच्या मागण्या वरिष्ठांच्या कानावर घालण्यासाठी नगरसेवक श्री. खान यांना घेऊन उपजिल्हाधिकारी श्री. देसाई, पोलिस निरीक्षक परेश नाईक हे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्या कार्यालयापर्यंत गेले. तेथे मडगावचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी उपस्थिती लावून मांगोरहिल ‘कंटेन्मेंट झोन’मधील लोकांच्या व्यथा जिल्हाधिकारी श्री. रॉय यांच्या कानावर घातल्या. मात्र, प्रशासनाकडून कोणताच ठोस निर्णय अद्याप घेतलेला नाही.
दरम्यान, ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये उपोषण छेडले जाईल. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार म्हणून मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त मांगोरहिल येथे तैनात करण्यात आला होता. धो धो पाऊस कोसळत असतानाही शेकडो रहिवासी उपोषणासाठी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांच्या ताब्यात असलेले नगरसेवक श्री. खान यांना पोलिसांनी पुन्हा ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये आणून लोकांना माघारी परतण्याचे आवाहन करावे अशी विनंती केली. त्यानुसार श्री. खान यांनी लोकांना घरी जाण्यास सांगितल्यावर रस्त्यावर उतरलेले शेकडो लोक माघारी परतले.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या