राज्यातील महोत्सवांची झेप ‘पारपत्रा’त

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

गोव्यातील वेगवेगळे महोत्सव म्हणजे येथील कला, संस्कृती आणि जनजीवनाचा संगमच. या महोत्सवांचे चाहते गोव्याबाहेर आणि देशाबाहेरही आहेत. आता या महोत्सवांची झेप थेट पारपत्राच्या रुपात म्हणजेच फिलाटेलिक पासपोर्टच्या रुपात हौशी फिरस्त्यांच्या हातात पडणार आहे.

पणजी :  गोव्यातील वेगवेगळे महोत्सव म्हणजे येथील कला, संस्कृती आणि जनजीवनाचा संगमच. या महोत्सवांचे चाहते गोव्याबाहेर आणि देशाबाहेरही आहेत. आता या महोत्सवांची झेप थेट पारपत्राच्या रुपात म्हणजेच फिलाटेलिक पासपोर्टच्या रुपात हौशी फिरस्त्यांच्या हातात पडणार आहे. हा उपक्रम गोवा टपाल खात्याचा आहे. राज्यातील महोत्सवांची ख्याती आणि प्रसिद्धी सातासमुद्रापार नेण्यासाठी टपाल खात्याने चालविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

राज्यातील महोत्सवांची जागा आणि वेळ, महत्त्‍व या सारखी माहिती फोटोंसहित देणाऱ्या या पारपत्राला लोक पसंत करीत आहेत. या पारपत्रावर असणाऱ्या महोत्सवांमध्ये कार्निव्हल, सांजाव, गणेशचतुर्थी, दिवाळी, ख्रिसमस, ईस्टर, पाडवा, शिमगा आणि सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त, गुलाल, सांगोड, वीरभद्र, चिखलकाला या महोत्सवांची माहिती आणि आकर्षक फोटो आहेत. तसेच राज्यातील नवीन वर्षाचे होणारे सेलिब्रेशन आणि येथील कणसाचे फेस्त यासारख्या फेस्तची माहितीही याद्वारे मिळते. 

दहा पानी असणाऱ्या या पारपत्रांची किंमत केवळ ६०० रुपये आहे. राज्यातील टूर गाईड तसेच विदेशी लोकांना राज्यभरात फिरवणारे लोकही या पारपत्राचा प्रसार राज्यात येणाऱ्या पर्यटकांकडे करीत आहेत. या पर्यटकांकडून या उपक्रमाला पसंती दिली जात आहे. 
प्रयोग म्हणून काढण्यात आलेल्या ५० पारपत्रांची विक्री अवघ्या १० दिवसांतच झाली असून आता आणखी पारपत्र छापण्यात येत आहेत. 

संबंधित बातम्या