म्हापशातील घरे निवडणुकीपूर्वी कायदेशीर करा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी बेकायदा घरे कायदेशीर करण्याची घोषणा केली होती. त्या वेळी अनेकांनी अर्ज केले होते. ते तसेच राहिले आहेत. निवडणुकीपूर्वी ही १५३ घरे कायदेशीर करा व त्यांना शांतपणे मतदान करण्याची संधी द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे ​केली आहे.

म्हापसा- म्हापशात प्रत्येक निवडणुकीवेळी वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे बेकायदा असलेली म्हापशातील १५३ घरे निवडणुकीपूर्वी कायदेशीर करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी केली.

येथील इंद्रधनुष्य सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेत राजाराम पार्सेकर, पांडुरंग वराडकर, सुरेश कोरगावकर व संजू तिवरेकर उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, म्हापसा शहरात गरिबांनी बांधलेल्या बेकायदा घरातील लोकांना पालिकेमार्फत घरे मोडण्यात येतील, अशा नोटिसा पाठवून त्यांना भयग्रस्त करून त्यांची मते मिळवण्याचे काम भाजपा सरकार नेहमी करीत आले आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीचा आम्ही निषेध करतो व मतदारांना निर्भिडपणे मतदान करण्यास द्यावे, अशी मागणी करतो.

ते पुढे म्हणाले, की २५ सप्टेंबर २०२० रोजी पाठवलेल्या अशाच एका नोटिसीत २० जानेवारी २०२१ रोजी पालिका कार्यालयात येऊन त्या बेकायदा घरांच्या मालकांनी येऊन भेटावे, असे म्हटले आहे. या मधल्या काळात पालिका मंडळाची निवडणूक होणार आहे. याचा लाभ उठवून घरे कायदेशीर करायची असतील तर आमच्या अर्थांत भाजपच्या उमेदवाराला मत द्या, असे ठणकावून सांगण्यात येणार आहे. बेकायदेपणाची टांगती तलवार या घरातील मतदारांवर राहाणार आहे.

ती बेकायदा घरे खोर्लीतील दोन प्रभागांत व कुचेली येथील कोमुनिदादीच्या जागेत आहेत. झोपडपट्टीतील लोकांच्या विकासासाठी करोडो रुपये केंद्र सरकारकडून येतात; पण, इथे मात्र विकास होताना दिसत नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी बेकायदा घरे कायदेशीर करण्याची घोषणा केली होती. त्या वेळी अनेकांनी अर्ज केले होते. ते तसेच राहिले आहेत. निवडणुकीपूर्वी ही १५३ घरे कायदेशीर करा व त्यांना शांतपणे मतदान करण्याची संधी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मलनिस्सारण प्रकल्पाचे काम रस्त्यांच्या डांबरीकरणापूर्वी व्हावे

मलनिस्सारण प्रकल्प त्वरित पूर्ण करून तार नदीचे पात्र शुद्ध ठेवण्यास सरकारने मदत करावी. जनतेच्या करातून मिळालेले कोट्यवधी रुपये सध्या जमिनीखाली गाडले गेले आहेत. रस्त्यांचे डांबरीकरण करण्याआधी मलनिस्सारण प्रकल्प पुरा करावा. अन्यथा रस्त्यांचे खोदकाम करून पुन्हा वाट लागेल याची जाणीवही श्री. बर्डे यांनी करून दिली.
 

संबंधित बातम्या