मच्छिमार बांधवांना कॉर्पस् फंड वापरास द्या: हर्षद धोंड

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष हर्षद धोंड यांची सरकारकडे मागणी

नावेली: कोरोना संकटाच्या काळात त्रासात सापडलेल्या मच्छिमार बांधवांना कॉर्पस् निधीतील रक्कम वापरण्यास सरकारने द्यावी, अशी मागणी अखिल गोवा ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी केली.

जर नैसर्गिक आपत्तीवेळा बोट दुर्घटना घडल्यास बोट मालकांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ट्रॉलर मालकांकडून वार्षिक रक्कम व गोवा सरकारकडून त्यात काही रक्कम घालून कॉर्पस निधी तयार करून नैसर्गिक आपत्ती किंवा एखादी बोट समुद्रात बुडाल्यास त्या संबंधित बोट मालकाला आर्थिक मदत मिळावी म्हणून या फंडातील व्याजातून ही रक्कम देण्याची तरतूद केली होती.

७ एप्रिल रोजी मांडवी फिशरमेन मार्केटिंग को- ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड मालिम जेटीचे अध्यक्ष फ्रान्सिस्को डिसोझा यांनी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना निवेदन देऊन नोव्हेंबर २०१९च्या दुसऱ्या आठवड्यात मच्छिमारांना चार वादळांचा सामना करावा लागला. यात वायू, फंज, कायर आणि महावादळांचा समावेश होता. त्यामुळे बोटीवर काम करणाऱ्या कामगारांना ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्याचा पगार देणे बोटमालकाना शक्य झाले नाही. त्यानंतर २२ ते २५ मार्च कोरोना काळात टाळेबंदी लागू करण्यात आल्यामुळे मालिम जेटीवरील सर्व बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या नाहीत. या काळात आइस प्लांट, डिझेल पंप, किराणा दुकाने बंद असल्याने बोट मालकांना खूप त्रास झाले. गेल्या आठ वर्षांत प्रत्येक बोट मालकांकडून वर्षाला दहा हजार व सरकारकडून त्यात रक्कम जमा करून सुमारे १९ कोटी रुपये फंड जमा झाला आहे. त्याचे व्याज मिळून सुमारे २२ कोटी रुपये कॉर्पस फंड स्टेट बँकेत जमा करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी मासेमारीच्या मोसमात ऑगस्ट महिन्यात दोन बोटी कांपाल ते मिरामार मार्गावर सँडबार तयार झाल्याने बुडाल्या. बार्ज व्यवसाय बंद असल्याने कांपाल ते मिरामार मार्गावर सॅण्डबार तयार होतात. त्यामुळे समुद्राला भरती आल्या नंतर बोटी समुद्रात मासेमारीसाठी जातात, अशी स्थिती कुटबण जेटीवर तसेच शापोरा जेटीवर आहे. सॅण्डबार कॅप्टन ऑफ पोर्ट अंतर्गत येत असल्याने मच्छिमार खाते त्यात लक्ष घालत नाही.

कोरोना महामारी संकटाच्या काळात या फंडातील रक्कम बोटमालकांना देण्याची गरज आहे, असे बोटमालक सीताकांत परब यांनी सांगितले. संचालिका डॉ. शमीला मोंतेरो यांनी कॉर्पस फंड तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आला होता. फंडाच्या व्याजातून बोटमालकांना नैसर्गिक आपत्ती सापडल्यास त्यातून आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या