मार्गदर्शक तत्वांचे पालन करून कोविडविरुद्ध लढुया

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

डॉ. श्याम काणकोणकर : ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्थेतर्फे आरोग्य केंद्राला साहित्य प्रदान

वाळपई: कोरोनाने गेल्या सहा महिन्यांत पूर्ण जगावर कब्जा केला आहे. कोरोनाचे हात पाय बरेच पसरत चालले आहेत. या विषाणूमुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमविले आहे. जागतिक आरोग्य संघटना व संशोधक मागील सहा महिने कोविडसाठी रात्रंदिवस लढा देत आहेत. अनेकजण डॉक्टर यावरील लस शोधत आहे. तरीदेखील आम्ही सर्वांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत कोविड १९ विरोधात लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन वाळपई आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. श्याम काणकोणकर यांनी केले आहे. 

ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात काणकोणकर बोलत होते. या संस्थेच्या पदाधिकारी वर्गाने कार्यक्रमानिमित्त त्यांच्याशी संवाद साधून कोविडविषयी माहिती जाणून घेतली. 

डॉ. काणकोणकर म्हणाले, कोरोनाबाधित रुग्ण हा एक माणूसच असतो. रुग्ण म्हणजे आमचा शत्रू नव्हे. आमची लढाई ही कोरोना विरोधात आहे. कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य खाते योगदान देत आहे. तसेच स्वयंसेवक, कोविड योध्दे कार्यरत आहेत, पण कोरोना जास्त पसरणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे. तसेच विविध संस्थांनी देखील याबाबत वेळीच जागृती केली पाहिजे. गोव्यात रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. यावर नियंत्रण येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. वाळपई आरोग्य केंद्राचे डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदी काम करीत आहेत.

यावेळी ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष झिलू गावकर यांच्या हस्ते कोविड योध्दांना लागणाऱ्या आवश्यक साहित्य डॉ. श्याम काणकोणकर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी डॉ. अभिजीत वाडकर, डॉ. जल्मी, संस्थेचे पदाधिकारी डॉ. रघुनाथ धुरी, अंकुश धुरी, गौरेश गावस आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या