आझाद मैदानावर दिवाळीची पूर्वसंध्या होणार ‘दीपसंध्या’

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गोव्यातील तब्बल तेरा समविचारी संस्था एकत्रितरित्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाजवळपारंपरिक पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) मातीच्या पणत्या पेटवून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येईल.

पणजी :  सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गोव्यातील तब्बल तेरा समविचारी संस्था एकत्रितरित्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाजवळपारंपरिक पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) मातीच्या पणत्या पेटवून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येईल. टाळेबंदी काळात राजधानी पणजीची सेवा केलेले महानगरपालिकेतील कोविड योद्धे व इतर सेवाभावी यांना दिवाळीची मिठाई वाटून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. हा आगळा उपक्रम सम्राट क्लब पणजीने रोटरी क्लब पणजी, युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाची गोवा शाखा, रोटरी पणजी मिडटावून क्लब, रोटरी पणजी रीव्हीएरा, लायन्स क्लब पणजी, रोटरी क्लब मिरामार, रोटरॅक्ट क्लब पणजी, गोवा रेडक्रॉस माजी सैनिक संघटना,डिसॅबिलिटी राईट्स असोसिएशन गोवा आदी संस्थाच्या सहयोगाने आयोजित केला आहे.

सम्राट क्लब पणजीचे अध्यक्ष संदीप प्रभू यांनी सांगितले, की टाळेबंदीबाबतची सामाजिक अंतर व इतर बंधने पाळून हा उपक्रम पार पाडला जाईल. दिवाळीनिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहणे आणि टाळेबंदी काळात पणजी राजधानीची जोखीम पत्करून सेवा केलेले महानगरपालिकेचे कोविड योद्धे व इतर सेवक यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना दिवाळीची मिठाई वाटणे हा मनस्वी उद्देश आहे.

एरव्ही आम्ही दरवर्षी दीपसंध्या करमणूक प्रधान कार्यक्रमाने साजरी करायचो. पत्रकार परिषदेला उपक्रमाचे समन्वयक प्रवीण सबनीस, युथ हॉस्टेल असोसिएशनचे अध्यक्ष रोहिदास नाईक, डिसॅबिलिटी राईट्स असोसिएशचे आवेलिनो डिसा, लायन्स क्लब पणजीचे अध्यक्ष शामसुंदर मोरजकर उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या