लोबोंना रूग्णांपेक्षा खासगी रूग्णालयांची काळजी; आम आदमी पक्षाचा घणाघात

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

बहुतेक मंत्र्यांनी खासगी इस्पितळांमध्येच उपचार घेतले आहेत मात्र सर्वसामान्य गोमंतकीयांनी या खासगी इस्पितळात योजनेखाली उपचार घेतल्यास मंत्री लोबो यांना अडचणीचे वाटते. 

पणजी- दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेमध्ये (डीडीएसएसवाय) खासगी कोविड उपचारांचा समावेश केल्यास खासगी इस्पितळात कोरोना रुग्ण वाढतील असे स्पष्टीकरण कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दिले आहे.  यावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला आहे. गोमंतकिय कोरोना रुग्णांपेक्षा खासगी इस्पितळे त्यांना अधिक महत्त्वाची आहे, असा आरोप पक्षाचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी आज केला. 

खासगी इस्पितळांची बाजू घेऊन लोबो यांनी गोमंतकीयांना वाऱ्यावर सोडण्याची तयारी केली आहे. सामान्य रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तरी चालेल मात्र त्यांना ही इस्पितळे अधिक जवळची वाटू लागली आहे अशी कडाकडून टीका तिळवे यांनी करून माजी गोवा लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी मंत्री लोबो यांना ते मंत्री होण्यास लायक नसल्याचे केलेले विधान हे बरोबरच होते. त्यांना सर्वसामान्य गोमंतकियांचे काहीच पडलेले नाही हे सिद्ध होत आहे. बहुतेक मंत्र्यांनी खासगी इस्पितळांमध्येच उपचार घेतले आहेत मात्र सर्वसामान्य गोमंतकीयांनी या खासगी इस्पितळात योजनेखाली उपचार घेतल्यास मंत्री लोबो यांना अडचणीचे वाटते. 

कोविडवरील उपचार खासगी इस्पितळामध्ये करण्यासाठी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेत समावेश करण्यात यावा जेणेकरून ही सुविधा प्रत्येक गोमंतकियाला मिळून त्यांना मोठा दिलासा देणारी ठरेल. हा उपचार योजनेत समावेश न करण्यामागे मंत्री मायकल लोबो यांचा काहीतरी स्वार्थ असल्याचे दिसून येते. ज्या तऱ्हेने त्यांनी योजनेचा समावेश रद्द केल्याच्या अधिसूचनेचे उत्साहाने स्वागत केले, त्यावरून त्यांच्या मनातला उद्देश स्पष्ट होतआहे. हातातील नोकरी आणि उद्योग गेल्यामुळे आधीच तणावाखाली असलेल्या गोवेकरांना कोविड उपचाराचा भरमसाट खर्च जखमेवर मीठ चोळणारा ठरला आहे. सरकारी इस्पितळामधील क्षमता मर्यादित असते हे आम्हा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे परवडणाऱ्या खर्चामध्ये खासगी इस्पितळामध्ये सुविधा देणे ही काळाची गरज होती आणि त्यामुळे दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजना हे एक स्वागतार्ह पाऊल होते असे तिळवे म्हणाले.  
मंत्री मायकल लोबो यांनी उद्योजकांकडून चालविल्या जाणाऱ्या खासगी इस्पितळांची बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य गोमंतकियांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रयत्न करावेत. ज्या लोकांनी मते देऊन त्यांना निवडून आणले अशा लोकांबाबत त्यांनी जबाबदारीने वागण्याची हीच वेळ आहेज, असे ते पुढे म्हणाले.

संबंधित बातम्या