डोंगर कापून रस्ता करण्याला स्थानिकांचा विरोध

Dainik Gomantak
सोमवार, 15 जून 2020

अडणे-बाळ्ळी पंचायततीत दावतेवाडा येथील घटना : आज ग्रामस्थांची निदर्शने
 

नावेली, 

अडणे-बाळ्ळी पंचायत क्षेत्रातील दावतेवाडा येथे बेकायदा डोंगर कापून शेत जमिनीतून रस्ता तयार करण्यात येत असून त्यासाठी कुठलाही परवाना कंत्राटदारांने घेतला नसून हे बेकायदा काम त्वरित बंद करावे अशी मागणी करून या शनिवारी स्थानिक पंच सदस्यासमवेत सुमारे ७० हून अधिक स्थानिक लोकांनी रस्त्याची पाहणी करून विरोध दर्शविला.
स्थानिक नागरिक पुंडलिक वेळीप यांनी हा रस्ता तयार करण्यासाठी त्यांना कोणी परवाना दिला ते आम्हाला माहीत नसून हे काम बेकायदा सुरू आहे. आम्ही आदिवासी लोक या डोंगरावरील काजू तसेच ही जमीन गेली अनेक वर्षे राखून ठेवली.आता कोणीतरी या ठिकाणी बेकायदा डोंगर कापून रस्ता तयार करीत असून त्यामुळे आमच्या घरांना पावसात धोका संभवतो. पाऊस पडल्यावर डोंगर कोसळून माती आमच्या घरावर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या जंगलात गवे, वाघ व कोल्हे असून ते राहतात आपण स्वतः पाहिले असल्याचे वेळीप यांनी सांगितले. हा परिसर 'नो डेव्हलपमेंट झोन' असून सरकारी नियमानुसार या ठिकाणी कोणतेही काम करता येत नाही मग, या कंत्राटदाराला कुणी परवाना दिला याची चौकशी करून हे काम बंद पाडण्यात यावे व गावात काँक्रीट जंगल न करता गावला लाभलेले नैसर्गिक वरदान राखून ठेवावे, अशी मागणी वेळीप यांनी केली.
या भागाचे पंच सदस्य रघुनाथ देयकर यांनी स्थानिक पंचायतीने हा रस्ता करण्यासाठी परवाना दिलेला नाही.
वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्ता तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या जेसीबीची चावी आपल्या ताब्यात घेतली असून ते कोणती कारवाई करतात याकडे स्थानिकांचे लक्ष आहे. आपला पाठिंबा स्थानिकांना असून न्याय मिळेपर्यंत लोकाबरोबरच राहणार असल्याचे देयकर यांनी सांगितले.
माजी पंच सदस्य संजय वेळीप यांनी या संदर्भात आपण स्थानिक आमदार तसेच उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली असून त्यांनी पंचायतीमार्फत ठराव घेऊन नगर नियोजन खात्याजवळ पाठवून देण्यास सांगितले आहे. त्यानुसार पंचायतीत ठराव घेऊन त्याच्या प्रति सर्व आवश्यक संबंधित खात्यांना पाठवून देण्यात येणार आहेत.
यावेळी पंच सदस्या संजना वेळीप यांनी सर्वांनी एकजूट दाखवून या बेकायदा कामाला विरोध करावा, असे आवाहन स्थानिकांना केले. हर्षद गावकर यांनी आपण सुरवातीपासून या कामाला विरोध करीत असून शेवट पर्यंत आपला विरोध सुरूच राहणार आहे.
यावेळी स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी पंच सदस्य राजू गोसावी काही माजी पंच सदस्य स्थानिक महिला युवक युवती तसेच ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते. सोमवारी बाळ्ळी पंचायतीसमोर सकाळी १०.३० वाजता या बेकायदा डोंगरकापणी व बेकायदा रस्त्याच्या विरोधात हे स्थानिक निदर्शने करणार आहेत.
जलवाहिनी फुटली, झरही धोक्यात
ज्या डोंगरावरून रस्ता तयार केला जात आहे त्याठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी आहे. रस्ता तयार करताना ही जलवाहिनी फोडण्यात आली आहे. काही अंतरावर पाण्याची टाकी असून या टाकीतून पाण्याचा पुरवठा देवतेवाड्यावरील लोकांना केला जातो. ही जलवाहिनी फोडल्याने लोकांना पाणी मिळत नाही, तसेच गावात एक झर असून ती देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

 

गोवा गोवा

संबंधित बातम्या