‘लॉकडाऊन’मुळे सामान खरेदीसाठी धावपळ

sahakar bhandar
sahakar bhandar

पणजी

राज्यात वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने येत्या शुक्रवारपासून (१७ जुलै) तीन दिवस लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करताच लोकांची सामान खरेदीसाठी धावपळ सुरू झाली. आज दुपारपासून पणजीतील गोवा सहकार भांडाराच्या बाहेर ग्राहकांनी भरपावसात रांगा लावल्या होत्या. उद्याही किराणा माल दुकानांवर लोकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ असूनही राज्यातील लोक कामाविनाही रस्त्यावर येत आहेत. या महामारीबाबत लोकांना कोणतेच गांभीर्य नाही. यापूर्वी राज्यात लॉकडाऊन केला होता व अचानक त्यात वाढ केल्यानंतर लोकांना जीवनावश्‍यक वस्तूंसाठी धावाधाव करावी लागली होती. सरकारने हा लॉकडाऊन जरी तीन दिवसांचा घोषित केला असला तरी तो त्यानंतर खुला केला जाईल याबाबत लोकांचा विश्‍वास उडालेला आहे. राज्यातील काही भागात कनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे त्याची मुदतही वाढवली जात आहे. त्यामुळे सरकारच्या या घोषणांवर कितपत विश्‍वास ठेवायचा याबाबतही लोकांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच सामानाचा साठा जमा करून ठेवण्याच्या उद्देशाने लोकांनी गर्दी केली. 
पणजी शहरात आज दिवसभर पाऊसाची रिपरिप सुरूच होती. सरकारने केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पणजीबरोबरच इतर शहरात लोकांनी दुकानांवर गर्दी केली. पावसाची पर्वा न करता छत्री घेऊनही लोक पणजीतील जुन्ता हाऊस इमारतीतील सहकार भांडाराच्या दुकानाबाहेर उभे होते. अनेकांनी महिन्याचे सामान भरले असताना या लॉकडाऊनच्या भीतीनेच पुन्हा आणखी सामानाचा साठा करून ठेवण्यासाठी गर्दी केली. संध्याकाळी उशिरापर्यंत दुकानांमध्ये लोकांची गर्दी दिसत होती. या ठिकाणी ग्राहकांना सामान खरेदीची घाई झाल्याने सामाजिक अंतर ठेवताना ते दिसत नव्हते. कोविड - १९ च्या मार्गदर्शक सूचनांची दुकानामध्ये अंमलबजावणी करून काही ठराविक ग्राहकांना एकावेळी खरेदीसाठी आत सोडण्यात येत होते. 
पणजीतील मार्केट संकुलात आज संध्याकाळी अचानक गर्दी दिसून आली. दिवसभर गर्दी नसलेल्या दुकानांवर सामान खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली. या तीन दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्‍यक सेवा तसेच जीवनाश्‍यक वस्तूंची दुकाने खुली राहणार आहेत तरीही लोकांनी भीतीनेच ही गर्दी केली. त्यामुळे लोकांनी कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर सरकारने लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यूबाबत कोणताही निर्णय घेतला तरी त्याची शहानिशा न करता मार्केटमध्ये धाव घेण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. कोरोनामुळे राज्यातील लोक भयभीत झाले आहेत. त्याची लागण कोठून व केव्हा होईल याचा नेम नाही अशी चर्चा लोकांमध्ये होत आहे. लोक मार्केट किंवा इतर ठिकाणी भीतीच्या छायेमध्ये फिरताना दिसून येतात. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com