पेडणेत आर्थिक व्यवस्थेस संजीवनी

प्रकाश तळवणेकर
रविवार, 6 सप्टेंबर 2020

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मागील साडेपाच महिने पेडणे तालुक्यातील सर्व नोकरी-व्यवसायांवर गदा आलेली आहे

पेडणे:  कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मागील साडेपाच महिने पेडणे तालुक्यातील सर्व नोकरी-व्यवसायांवर गदा आलेली आहे. सर्वांचीच आर्थिक गोची झालेली आहे. जे रोजंदारीवर औद्योगिक वसाहतीत नोकरी करायचे त्यातील काहींना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. तर काहींना अर्ध्या पगारावर काम करावे लागत आहे. टॅक्सी, दुचाकी पायलट, खासगी बसवाल्यांचा व्यवसाय ठप्प आहे. सर्व प्रकारची दुकाने लहान-मोठ्या दुकानांना ग्राहक नसल्यामुळे घर खर्च कसा चालवायचा? याच्या विवंचनेत अनेक कुटुंबे आहेत. पेडणे तालुक्यात अनेकांनी भाजी आणि मासळी विक्री व्यवसाय सुरू केला आहे. अनेकजण बेरोजगार असून ही वाईट परिस्थिती लवकरच बदलेल या आशेवर काहीजण जगत आहेत.

ज्यांनी भाजीविक्रीचा व्यवसाय केला त्यात काही जण हे विविध प्रकारचे दुकानदार आहेत. दुकानात ग्राहक नाही म्हणून त्यांनी जोड व्यवसाय सुरू केला. काहीजणांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

मासळी विक्रीच्या व्यवसायात आज अनेक जण उतरले आहेत. त्यातील काही स्वतःच्या मालकीची किंवा भाड्याच्या वाहनातून बेती, मडगाव किंवा अशाच ठिकाणाहून घाऊक पध्दतीने मासळी खरेदी करून विक्री करत आहेत. तर काही मासे विक्रेते घाऊक पध्दतीने मासळी विकत घेऊन दुचाकीवरून तालुक्यात किंवा  गावातील मासळी मार्केटमध्ये विक्री करत आहे. काहीजण घरोघरी फिरून वाड्यावाड्यांवर मासळी विकत आहेत.

संबंधित बातम्या