टाळेबंदीचा जैवविविधतेवर सकारात्‍मक लाभ

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

कोट्यवधी खर्चून साध्‍य नव्‍हते, ते साठ दिवसांत जमले : मात्र, कामगारांचे प्रचंड नुकसान

काणकोण

‘कोविड-१९’मुळे जाहीर केलेल्‍या टाळेबंदीचा पर्यावरण व जैवविविधतेवर सकारात्मक परिणाम झाल्‍याचे काणकोण येथील ज्ञानप्रबोधिनी मंडळाच्या श्री मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. एफ. एम. नदाफ यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी एक पेपर सादर केला आहे. मार्च ते मे महिन्यापर्यंत चालू असलेल्या टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम हवा, पाणी व प्राणी जगतावर झाला आहे. देशात व जगभरात हवा, जल याचे प्रदूषण रोखणे व प्राणी व वने यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जे साध्‍य होत नाही, ते साठ दिवसांच्या टाळेबंदीत साध्‍य झाले. हा टाळेबंदीचा सकारात्‍मक परिणाम असल्याचा दावा डॉ. नदाफ यांनी केला आहे.

प्राणी जगताचा मुक्त संचार
टाळेबंदीच्‍या काळात सांगे तालुक्यात ब्लॅक पँथरने दर्शन दिले. हजारो स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबई खाडीत मुक्त विहार करू लागले आहेत. मुंबईच्या किनारपट्टीवर डॉल्फिनचे लोकांना दर्शनही झाले. डेहराडूनमध्ये हत्तीचे कळप दिसू लागले. चंदिगड येथे सांबार चित्तळांचे दर्शन झाले. नोयडामध्ये निलगाय मुक्तपणे संचार करताना दिसून आल्‍या. सात वर्षांनंतर छत्तीसगडमध्ये ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. गुवाहाटीमध्ये एकशिंगी गेंडा पाहण्यास मिळाला. मुंबईमध्ये महात्मा फुले चौकात छप्परावरून चित्तळ पडले. तिरुपतीमध्ये चितळ सापडले. आंध्रप्रदेशात एका काजू बागायतीत अस्वलाने दर्शन दिले. जगात इंडोनेशियामध्ये किनाऱ्यालगत देवमाशाचे दर्शन झाले. जपानच्या महामार्गावर चित्तळाचे कळप आढळले. टाळेबंदी काळात अनेक पक्षी व दुर्मिळ प्राण्यांचा मुक्त संचार झाला. काहींना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. कोझिकोडमध्ये लुप्त होण्याच्या मार्गावर असले सीव्हियट प्राणी आढळला.

कोरोनाचा इतिहास
पहिल्यांदा १९३० मध्ये प्राण्यात कोरोनाचा विषाणू सापडला होता. त्यानंतर तब्बल ३० वर्षांनी म्हणजे १९६० मध्ये कोंबड्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. वटवाघळे, मांजर, डुक्कर आणि अन्य सस्तन प्राण्यांत कोरोनाचे शेकडो विषाणू संसर्ग करतात. १६६५ मध्ये इंग्लंडमध्ये प्लेगाची साथ येऊन १ लाख लोक मृत्‍युमुखी पडले. १९१८-१९ या काळात स्पेनिश फ्लूने ५० दशलक्ष लोकांचा बळी जगाच्या १/३ भागात घेतला गेला. १९८१ मध्ये एचआयव्ही/एड्‍सने २५ ते ३५ दशलक्ष लोक संपूर्ण जगात मेले. २००२-०३ या कालावधीत सार्स कोव्हिडने चीनमध्ये ७७४ लोक बळी गेले. २०१४ ते २०१६ या कालावधीत पश्चिम आफ्रिकेत इबोलाने ११ हजार लोकांचा बळी घेतला. मर्स कोव्हिडने सौदी अरेबियात ८५० लोक मत्यूमुखी पडले.

कोरोनाचे सात ज्ञात विषाणू
२२९ ई (अल्फा), एन एल ६३ (अल्फा), ओसी ४३ (बिटा), एच.आर.यू आय (बिटा), एम ई आर एस कोव्हिड, सार्स कोव्हिड व सार्स कोव्हिड २, हा कोव्हिड-१९ असून त्याचे आकारमान १२५ मिलिमीटर असते. यापैकी चार कोरोनाचे विषाणू मानवी आरोग्यास तीव्र धोकादायक आहेत. या विषाणूने आतापर्यंत जगभरातील सात हजार दशलक्ष लोकांना टाळेबंदीत बंदित केले आहे. पहिला कोरोनाचा विषाणू मानवी शरीरात १७ नोव्हेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात सापडला. भारतात तो केरळ राज्यात ३० जानेवारी २०२०मध्ये करोना बाधित पहिला रुग्ण सापडला होता.

हवा व पाण्याचा दर्जा सुधारला
‘कोविड-१९’च्या काळात सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे मानवाला नियोजन करूनही गेली अनेक वर्षे शक्य झाले नाही ते टाळेबंदीने शक्य करून दाखवले. मुंबई, दिल्ली व जगातील रोम व इटली वगळता अन्य शहराच्या हवेच्या दर्जात कमालीची सकारात्मक सुधारणा झाली आहे.
केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद केली आहे. गेली अनेक वर्षे गंगा, यमुना प्रदूषण मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्यामध्ये यश आले नव्‍हते. मात्र, टाळेबंदीमुळे कारखाने बंद असल्याने, कचरा नदीच्या पात्रात फेकणे बंद झाल्याने गंगा व यमुना नदीच्या पाण्याचा दर्जा कमालीचा सुधारला आहे.
हवेचा दर्जा सुधारल्याने सध्‍या काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडाची नैसर्गिक सौंदर्य खुलू लागले आहे. बिहार, पश्चिम बंगालमधील रहिवाशांना शेकडो कि.मी. अंतर दूरवरून हिमालयाचे सौंदर्याचा स्वच्छ हवामानामुळे अनुभवण्याची संधी टाळेबंदीच्‍या काळात मिळाली आहे. काडमांडू पासून माउंट एव्हरेस्ट पाहता येतो. पश्चिम बंगालातील सिलिगुडी येथून हिमालयाचे कांचनगंगा शिखर पाहता येते. शाहरणपूर रहिवाशांना गंगोत्री पाहण्याचे भाग्य लाभत आहे, जे शैकडो वर्षे खराब हवामानामुळे झाकले गेले होते. टाळेबंदीत कार्बन उत्सर्जनात घट झाली. युएनओ हवेतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, त्याचे प्रयत्न तोडके पडत होते. टाळेबंदीने ते साध्‍य करून दाखवले आहे.

टाळेबंदीने काय दिले?
टाळेबंदीमुळे मानवाला गरजा मर्यादित करायला शिकवले. ७ हजार दशलक्ष लोकांनी टाळेबंदीत मर्यादित गरजांवर आपला चरितार्थ भागवला. त्यामुळे घनकचऱ्याचे प्रमाण कमी झाले. टाळेबंदीत मजुरांचे, कामगारांचे भरून न येणारे नुकसान झाले. दिवसेंदिवस वाढत चाललेले हवा, जल यांचे प्रदूषण, प्राण्यांचा दुर्मिळतेकडे चाललेला प्रवास आणि त्यासाठी जलप्रदूषण, वायू प्रदूषण त्याचप्रमाणे प्राणी व वने याच्या संवर्धनासाठी करण्यात येणारा खर्च पाहता लॉकडाऊनमुळे कितीतरी पटीने त्या खर्चाची बचत झाली आहे. त्याचसाठी दरवर्षी वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रात प्रत्येकी एका आठवड्याची टाळेबंदी फलदायी ठरू शकणार आहे. त्यामुळे भूमीला नैसर्गिक प्रक्रियेने समतोल राखणे शक्य होईल.

संबंधित बातम्या