टाळेबंदी पडली गोमंतकीय मच्छिमारांच्या पथ्यावर

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

गोमंतकीय मच्छिमारांना टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सापडलेली मासळी व मिळालेला चांगला दर यामुळे हंगामाच्या अखेरीस काहिसा दिलासा मिळाला.

मडगाव

 ‘कोरोना’मुळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी इतर उद्योगांचे कंबरडे मोडणारी ठरलेली असतानाच गोव्यातील मच्छिमारांसाठी मात्र लाभदायक ठरली आहे. वादळामुळे हातचे गेलेले तीन महिने व त्यानंतर मासळीची दुष्काळ यामुळे मेटाकुटीस आलेल्या गोमंतकीय मच्छिमारांना टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सापडलेली मासळी व मिळालेला चांगला दर यामुळे हंगामाच्या अखेरीस काहिसा दिलासा मिळाला.
टाळेबंदी जाहीर झाली तेव्हा गोव्यात मासेमारी बंदीही लागू करण्यात आली होती. ही बंदी उठवण्यासाठी मच्छीमार संघटनांनी मागणी लावून धरली होती. १० एप्रिलला मासेमारी बंदी उठवण्यात आली आणि मासेमारी पुन्हा सुरू झाली. याच दरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकात मात्र मासेमारी बंद राहिली. याचा लाभ गोमंतकीय मच्छिमारांना मिळाला, असे कुटबण मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनय तारी यांनी सांगितले.
टाळेबंदी काळात महाराष्ट्र व कर्नाटकातील ट्रॅालर्स मासेमारीसाठी समुद्रात उतरले नाही .कर्नाटकातील एका मलपे बंदरातीलच हजारो ट्रॅालर्स गोव्याच्या सागरी हद्दीत व हद्दी लगतच्या क्षेत्रात मासेमारी करतात. हे ट्रॅालर्स एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात मासळू पकडून घेऊन जातात. टाळेबंदीत हे ट्रॅालर न फिरकल्याने गोमंतकीय मच्छीमारांच्या जाळ्यात बऱ्यापैकी मासळी सापडली. शिवाय कर्नाटक, महाराष्ट्रात मासेमारी बंद असल्याने मासळी प्रक्रिया उद्योजकांकडून तसेच किरकोळ विक्रीत मासळीला चांगला दर मिळाला, असे तारी यांनी सांगितले.
यंदाचा मासेमारी हंगाम सुरु झाला आणि दोन वादळांमुळे पहिले तीन महिने सुकेच गेले. जून, जुलै महिन्यात मासेमारी बंदी असते व हंगाम ऑगस्टपासून सुरु होतो. पण, यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच वादळांमुळे ऑक्टोबरपर्यंत मासेमारी करता आली नाही. नोव्हेंबरमध्ये मासेमारी सुरू झाली खरी पण ट्रॅालरच्या जाळ्यात अभावानेच मासळी सापडू लागली. त्यामुळे ट्रॅालर मालक आर्थिक अडचणीत सापडले होते. काही जणांकडे तर ट्रॅालरमध्ये डिझल भरण्यासाठीही पैसे नसायचे. मार्च महिन्यात स्थितीत थोडी सुधारणा झाली. टाळेबंदी मात्र आम्हाला लाभदायक ठरली, असे तारी यांनी सांगितले.
१० एप्रिल ते मे अखेरपर्यंत गोमंतकीय मच्छीमारांना बरे दिवस आले. अन्यथा, खलाशांचे वेतन सोडाच त्यांना जेवण देणेही ट्रॅालर मालकांना परवडले नसते. टाळेबंदी लागू झाली तेव्हा काही ट्रॅालर मालकांनी आवरते घेतले होते. खलाशांनाही त्यांनी गावी जाऊ दिले होते. खलाशी नसल्यामुळे त्यांना ट्रॅालर समुद्रात उतरवता आले नाही. त्यामुळे काही ट्रॅालर मालक लाभापासून वंचित राहिले असे तारी यांनी सांगितले.
यंदा मासेमारी बंदी कालावधी पंधरा दिवसांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे मासेमारी १५ जूनपर्यंत सुकू राहणार आहे. निसर्ग वादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्र खवळलेला आहे. पुढील दोन दिवस वादळाचा प्रभाव असेल. त्यानंतर मासेमारीसाठी ट्रॅालर समुद्रात उतरतील. त्यामुळे मासेमारीसाठी दहा दिवस आम्हाला मिळतील. या दिवसातील ही मिळकत पुढचा हंगाम सुरू होईपर्यंत आमच्यासाठी महत्त्वाची ठरेल, असे तारी यांनी सांगितले.

खलाशांना गावी पाठवणार
कुटबण जेटीवरच्या बहुतांश खलाशांनी गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने त्यांना गावी पाठवण्यात येणार आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. गावी जाण्यास इच्छुक असलेल्या खलाशांचा राज्यनिहाय तपशील द्यावा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. खलाशांच्या तपशीलानुसार यादी तयार करून त्यांच्याशीट रेल्वेची सोय करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती विनय तारी यांनी दिली.

संबंधित बातम्या