‘लॉजिंग’ व्यवसायाला उतरती कळा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

कोरोनाचा परिणाम पर्यटन व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामध्ये लॉजिंगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात भरडला गेला आहे. अद्यापही या व्‍यवसायाला अच्छे दिन आलेले नाहीत.

पणजी : एक काळ होता जेव्हा गोव्यात येताना येथे राहण्यासाठीची बुकिंग इंटरनेटवर केले जात असे. मात्र कोरोनाचा परिणाम पर्यटन व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामध्ये लॉजिंगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात भरडला गेला आहे. अद्यापही या व्‍यवसायाला अच्छे दिन आलेले नाहीत. कारण, या क्षेत्रातसुद्धा ‘बार्गेनिंग’ म्हणेजच सौदेबाजीने प्रवेश केला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

राज्यातील लॉजिंग व्यवसायात असणाऱ्या काही हॉटेलमालकांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी पर्यटक प्रचलित दरात राहण्यास तयार होत असत. मात्र आता खोल्यांचे भाडे कमी करून मागतात. जसे की पूर्वी एका खोलीला ३००० रुपये प्रत्येकी दिवसाला घेतले जात असे मात्र आता लोक हीच भाव अगदी २००० किंवा १५०० रुपयांसाठी मागतात. सध्या आमच्याकडेही गिऱ्हाईक  नसल्याने आम्हाला नाईलाजाने त्‍यांची मागणी मान्‍य करावी लागते. राज्यात सध्या ८०० रुपये प्रति दिवसाच्या दरातसुद्धा खोल्या भाड्याने दिल्या जात असल्याची माहिती मिळाली. 

फ्‍लॅटभाड्याचेही दर उतरले!
ऑनलाईन पद्धतीने बुकिंग पूर्वी घेतले जात होते. मात्र, आता ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करण्याची पद्धत मागे पडत आहे. राज्यात अनेक फ्लॅटमध्ये राहणारे भाडेकरू घरे खाली करून गेले आहेत. ज्यामुळे त्यांचे फ्लॅट खाली आहेत. अनेक लोकांना सध्या वर्क फ्रॉम होम दिले जात असल्याने हे लोक गोव्यात जास्त दिवसासाठी कंटाळा घालविण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. राजधानी पणजीत सध्या १५००० रुपयांना एक बीएचके आणि २०,००० रुपयांना दोन बीएचके फ्लॅट भाड्याने दिले जात आहेत. फेसबुक तसेच व्‍हॉट्‍सॲप समूहाच्या माध्यमातून या फ्लॅटबद्दल सहज माहिती मिळत असल्याने लोक महिन्याभराचे नियोजन करूनच राज्यात राहण्यासाठी येत आहेत.

संबंधित बातम्या