म्हापशातील विक्रेत्यांत जागावाटपावरून संघर्ष

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

म्हापसा बाजारपेठेत जागावाटपावरून जुने विक्रेते व नवीन विक्रेते अशा दोन गटांत सध्या संघर्ष सुरू असून, त्यामुळे त्या दोन्ही घटकांत असंतोष निर्माण झाला आहे. नव्याने पुनर्स्थापित केलेल्या पालिकेच्या टाऊन वेडिंग समितीची कार्यवाहीबाबत असलेली निष्क्रियता, अकार्यक्षमता व एकंदर सुस्त कारभारामुळे असे झाले आहे.

म्हापसा : म्हापसा बाजारपेठेत जागावाटपावरून जुने विक्रेते व नवीन विक्रेते अशा दोन गटांत सध्या संघर्ष सुरू असून, त्यामुळे त्या दोन्ही घटकांत असंतोष निर्माण झाला आहे. नव्याने पुनर्स्थापित केलेल्या पालिकेच्या टाऊन वेडिंग समितीची कार्यवाहीबाबत असलेली निष्क्रियता, अकार्यक्षमता व एकंदर सुस्त कारभारामुळे असे झाले आहे. हा वाद विकोपाला जाऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे तथा दुकानदारांचे आहे.

या एकंदरीत परिस्थितीमुळे बाजारपेठेत पूर्वीचे विक्रेते जागावाटपाबाबत असमाधानी आहेत. तसेच, काही ठिकाणी दुकानांसमोरच विक्रेत्यांना पालिकेने जागा उपलब्ध करून दिल्याने दुकानदार नाराज असून,  त्यामुळे पालिका, दुकानदार व विक्रेते यांच्यात वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. दुकानांच्या समोरच अडथळा निर्माण करून तिथे विक्रेत्यांना जागावाटप केल्याचा आरोप काही दुकानदारांनी पालिकेच्या प्रशासनावर केला आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसां बाजारपेठेत तणावग्रस्त स्थिती निर्माण होऊ शकते, अशी येथील स्थिती आहे.

टाळेबंदीच्या काळात म्हापसा बाजारपेठेला मोठ्या प्रमाणात व्यावहारिकदृष्ट्या अवकळा आली होती व अजूनही बाजारपेठेतील आर्थिक व्यवहारांना पुरेशा प्रमाणात उत्थान तथा गतवैभव प्राप्त झालेले नाही. पालिका मंडळाने मागील कार्यकाळातील शेवटच्या बैठकीत शुक्रवारचा आठड्याचा बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. एकंदरीत बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही तत्कालीन नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी पालिका बैठकीत बोलताना दिली होती.

शुक्रवारचा बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिका मंडळाने घेतल्यानंतर त्याबाबत अंशत: कार्यवाहीसुद्धा झाली; पण, विद्यमान परिस्थितीत बाजारपेठेतील एकूण आर्थिक व्यवहारांबाबत एक नवीन वाद निर्माण झाला आहे. टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी बाजारपेठेत अंधाधुंद प्रकारे वागत कुठल्या कुठे बसणाऱ्या विक्रेत्यांना सध्या कुठे व कशा पद्धतीने जागावाटप करावे, हा प्रश्न सध्या पालिकेच्या समोर आहे. यासंदर्भात कोणतेही निकष तयार करण्यात न आल्याने व त्याबाबत पक्षपात केला जात असल्‍याने अशी जागा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आपल्यावर अन्याय होत आहे, असा त्या पूर्वाश्रमीच्या नियमित विक्रेत्यांचा दावा आहे.

म्हापशात साधारणत: चार वर्षांपूर्वी भाजी मार्केट नव्याने बांधले असले तरी जागावाटपाच्या संदर्भातील व्यवस्थापनात  पारदर्शकता न बाळगल्याने त्याबाबत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार या पूर्वी म्हापसा पीपल्स युनियनने म्हापसा पालिका, पालिका प्रशासन खाते, नगरनियोजन मंत्री, पोलिस खाते, दक्षता खाते इत्यादी कार्यालयांत केली होती. भाजी मार्केटमध्ये जागावाटप करणे हे मुळातच नियमबाह्य तथा बेकायदा आहे. तिथे केवळ दैनंदिन विक्रेत्यांना मुभा देता येते, असे यासंदर्भात बोलताना या संघटननेचे नेते जवाहरलाल शेट्ये व उपाध्यक्ष सुदेश तिवरेकर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.

सध्या मार्केट संकुलात नवीन विक्रेत्यांना स्थान देण्यात आले आहे. परंतु, टाळेबंदीमुळे रिक्त झालेल्या जागांवर लगेच पालिकेच्या मार्केट समितीतर्फे नवीन विक्रेत्यांना नियमबाह्य पद्धतीने सामावून घेण्यात आले आहे. त्याबाबत कोणतेही निकषही तयार करण्यात आले नाहीत. विक्रेत्यांची यादीही तयार करण्यात आली नाही. विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे विभाग तयार करणेसुद्धा बाजूलाच राहिले. पूर्वीच्या विक्रेत्यांना डावलून मनमानेल वृत्तीने बाजारपेठेत नवीन विक्रेत्यांना कुठेही बसू दिले जाते. पालिकेच्या या कार्यपद्धतीचा दुकानमालकांना तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या लोकांनाही त्रास होत आहे.

सध्या अधिकृत दुकानांच्या समोरच्या भागात असलेल्या फुटपाथवजा पॅसेजवर काही दुकानदार दुकानांतील माल ठेवत असून, बाजारहाट कण्यासाठी येणाऱ्या लोकांना ती कार्यपद्धती अडचणीची तथा त्रासदायक ठरत आहे. फुटपाथ व रस्ते रहदारीसाठी मोकळे ठेवावेत यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे खुद्द म्हापसा पालिकेकडून तसेच दुकानमालकांकडून होत आहे.
पादचाऱ्यांना त्रासदायक ठरणारे किंवा अडथळा निर्माण करणारे कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण बाजारपेठेत खपवून घेतले जाणार नाही, अशी सक्त ताकीद काही महिन्यांपूर्वी म्हापसा पालिकेचे तत्कालीन मु्ख्याधिकारी तथा पालिका संचालनालयाचे विद्यमान साहाय्यक संचालक क्लेन मदेरा यांनी व्यापाऱ्यांना दिली होती. परंतु, त्याबाबतची कार्यवाही आजपर्यंत झालेलीच नाही.

विक्रेत्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा व त्यांना आर्थिक चणचण भासू नये यासाठी वेगवेगळे प्रभाग अर्थांत विक्रेत्यांचे ‘झोन’ निर्माण करण्यात यावेत असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही त्याबाबत म्हापसा पालिकेने आजच्या घडीपर्यंत तरी कार्यवाही केलेली नाही. या मुद्द्याची कार्यवाही करणे पालिकेच्या मागील मंडळाच्या बेजबाबदार सदस्यांमुळे तसेच नगरपालिका संचालनालयातर्फे त्यासंदर्भात कोणतीच पावले उचलली नसल्याने शक्य झाले नाही, असा दावा म्हापसा पीपल्स युनियनतर्फे बोलताना सुदेश तिवरेकर यांनी केला 
आहे.

फुटपाथवर दुकानातील सामाना विक्रीस...
बाजारपेठेतील पदपथ व दुकानदारांच्या समोरच्या भागात व इतर ठिकाणी पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो अशा ठिकाणी विक्रेत्यांना बसवू देणे हे पूर्णत: नियमबाह्य आहे.  असे असले तरी व्यापाऱ्यांचे नेते म्हणून कार्यरत असलेले काही व्यापारी फुटपाथवर दुकानांतील माल विक्रीसाठी ठेवत असल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अखिल गोवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नारायण कारेकर यांच्या दुकानाच्या परिसरात हे चित्र प्रकर्षाने आढळून येते.

संबंधित बातम्या