गोव्यात टाळेबंदीमुळे लॉटरी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ

Lotry goa
Lotry goa

फातोर्डा  : भारतात व गोव्यात सोडत विक्रीला मान्यता आहे. सोडतीवर सरकार जीएसटी आकारते, बक्षीसपात्र रकमेवर आयकर कपात करते, तरीसुद्धा सोडत विक्रीला व्यवसाय म्हणून अजुनही सरकारने मान्यता दिलेली नाही. यास्तव लॉटरी विक्रेत्यांना धंद्यासाठी म्हणून किंवा भांडवल उभे करण्यासाठी म्हणा बॅंकांकडून कर्ज घेण्यासाठी अडचणी येतात. त्यासाठी सरकारने सोडत विक्रीला धंदा म्हणून मान्यता देण्याची अत्यंत गरज आहे, असे मडगावमधील प्रमुख सोडत विक्रेते विश्र्वनाथ बोरकर यांनी या प्रतिनिधीला सांगितले. 
टाळेबंदीमुळे गेल्या दोन महिन्यात एकही सोडत विकली गेलेली नाही. गोव्यात महाराष्ट्र, केरळ, मिझोराम, सिक्कीम सारख्या राज्यांतून सोडती विक्रीस येतात. मात्र, टाळेबंदी जाहीर झाल्यापासून त्या राज्यातील सरकाराने आपल्या एजंन्टद्वारा सोडतीचे वितरण केलेले नाही. त्यामुळे गोव्यातील अनेक शेकडो सोडत विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, असेही बोरकर यांनी सांगितले. 
मडगाव येथील नारायण बोरकर यांचे लॉटरी दुकान हे पोर्तुगिजकालीन सध्या त्यांची तिसरी पिढी हा धंदा चालवत आहे असेही बोरकर यांनी सांगितले. गोव्यात सात ते आठ प्रमुख विक्रेते आहेत. शिवाय रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी उभे राहून सोडत विकून आपला उदरनिर्वाह करणारे शेकडो सोडत विक्रेते आहेत, असे बोरकर पुढे म्हणाले. काहीजणांनी तर आपला व्यवसाय बदलणेच पसंत केले आहे. 
गेल्या दोन महिन्यात सोडत विक्रीची अनेक कोटी रुपयांची उलाढाल बंद झालेली आहे. जीएसटी लागू करण्यापूर्वी याच्यापेक्षा जास्त सोडत विक्रेते होते. पण सोडत विक्रीवर सरकारने जीएसटी लागू करताना भेदभाव केल्याने सोडत विक्रेत्यांची संख्या घटत गेली. जी सरकारे आपल्या राज्यात स्वतःच्या सोडत विक्री करतात त्यावर १२ टक्के जीएसटी निश्र्चित केला तर इतर सोडतीवर एकदम २८ टक्के जीएसटी दर ठरविला. त्यामुळे मराहाष्ट्र व केरळ याच राज्यातील सोडतींना १२ टक्के व इतर राज्यातील सोडती जे परराज्यात विकतात त्यावर २८ टक्के जीएसटी आकारणे सुरू झाले. त्यामुळे सोडत विक्रीवर विपरीत परिणाम झाल्याचे बोरकर म्हणाले. सरकारने यावर सहानुभूतीने विचार करून देशभर एकच जीएसटी दर ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 
२० मार्च पर्यंतच्या सोडतीचे निकाल झालेले आहेत.
२१ मार्च ते ३१ मार्च या काळात निकाल असलेल्या सो़डती विकल्या गेलेल्या आहेत, पण त्यांचा निकाल झालेला नाही. महाराष्ट्र व केरळ सरकारने पुढील काही दिवसात या सोडतींचा ड्रॉ केला जाईल असे सांगण्यात आले आहे असेही बोरकर यांनी सांगितले. यात महाराष्ट्र सरकारचा २२ लाख रुपये पहिले सामायिक बक्षीस असलेल्या निकाल जो २१ मार्चला होणार होता तसेच केरळ राज्याच्या सहा कोटी रुपये पहिले बक्षीस असलेल्या निकाल जो ३१ मार्च रोजी होणार होता, या सोडतींचा समावेश आहे. ज्या लोकांनी या सो़डती विकत घेतल्या आहेत ते निकालाची वाट पाहत आहेत व आपल्यापाशी दररोज निकालाची विचारपूस करीत असल्याचेही बोरकर म्हणाले. 
प्रोव्हेदोरियातर्फे अनेक वर्षांपासून गोवा सरकारच्या सोडतींची विक्री होत असे. गोव्यात या सोडती प्रसिद्ध होत्या. गोवेकरांच्या या सोडतीकडे भावनिक नाते होते. पण पर्रीकर मुख्यमंत्री असताना या सोडती बंद केल्या गेल्या. गोवा सरकारच्या सोडती मुंबईस्थित एका कंपनीमार्फत विक्री करार आहे. पण डिसेंबरनंतर या सोडतीही बंद झाल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com