डोंगरीत पाच दिवसांचे गणेश विसर्जन थाटात

प्रतिनिधी
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

डोंगरी मंडूर परिसरातील पाच दिवशांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन बुधवारी साध्या पद्धतीने करण्यात आले.

गोवा वेल्हा:  डोंगरी मंडूर परिसरातील पाच दिवशांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन बुधवारी साध्या पद्धतीने करण्यात आले. गणेशचतुर्थी उत्सव पाच दिवसांचा व्हावा, असा घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्णय घेतला होता. कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन डोंगरी धाकटे भाट व व्होडले भाट येथील ग्रामस्थांनी आपापल्या मंदिरात हा निर्णय वेळीच घेतला होता. 

तिसल परंपरा मोडू नये ग्रामस्थांचा निर्णय पक्का झाला होता. यामुळे किरकोळ अपवाद सोडल्यास या भागात पाच दिवस गणेशोत्सव साजरा झाला. यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची विनंती लोकांना केली होती. सर्वांच्या सुरक्षतेचा दृष्टीकोनातून हा निर्णय योग्य होता. गणेशमूर्ती प्रतिष्ठापना ते मूर्ती विसर्जनपर्यंत लोकांनी सहकार्य दाखवले. या काळात सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

पाच दिवसांच्या गणपतीला काल निरोप देण्यापूर्वी सकाळी घरोघरी व सार्वजनिक मंडळात श्रींची पूजा, दुपारी आरत्या व प्रसाद झाला. आरती, प्रसाद, दर्शन काळात लोकांनी गर्दी केली नाही. घरच्या यजमान आणि स्थानिक पुरोहितांनी धार्मिक विधीत भाग घेतला.

संध्याकाळी पाच वाजल्यापासून घरोघरी श्रींच्या उत्तर आरतीला प्रारंभ झाला. त्यानंतर विसर्जनाची तयारी सुरू झाली. यंदा प्रथमच दिंडी दिसली नाही किंवा आतिष बाजी दिसली नाही. या भागातील बहुतेक गणेशमूर्तीचे श्री गोळी बाबा पेडाजवळील खाडीत व मंडूर खाडीत विसर्जन करण्यात आले. वाहनांनी तर काहींनी स्वतःच गणपती विसर्जनस्थळी आणले. ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढल्या वर्षी लवकरऽऽऽ’ असा नामगजर केला. विसर्जनस्थळी अनावश्यक गर्दी न करण्याची विनंती लोक करताना दिसत होते. विसर्जनानंतर दोन्ही भागांतील सर्व मंदिरात विसर्जन सुरळीतपणे पार पडल्यानंतर देवस्थानच्यावतीने श्रींस गाऱ्हाणे घालण्यात आले.

संबंधित बातम्या