'मगो प्रवेश कार्यक्रमावेळी झालेले अडवणुकीचे राजकारण हीन पातळीचे'

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

पेडण्याचे आमदार तथा उपमुख्यमंत्री व मांद्र्यांच्या आमदारांनी धास्ती घेतली होती. सत्तेचा दुरुपयोग करून या दोघांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचे कारस्थान रचले. 

पेडणे- पेडणे येथे प्रवीण आर्लेकर यांच्या मगो प्रवेश सोहळ्यावेळी मिळालेल्या मोठ्या पाठिंब्याप्रमाणेच मांद्रे येथे माझ्या मगो प्रवेश कार्यक्रमातही प्रचंड पाठिंबा मिळेल व आपण सत्ताधारी पक्षात असूनही असा पाठिंबा मिळतो यावरुन आपली नाचक्की होईल, यावरून पेडण्याचे आमदार तथा उपमुख्यमंत्री व मांद्रेचे आमदार यांनी धास्ती घेतली होती. सत्तेचा दुरुपयोग करून या दोघांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचे कारस्थान रचले. 

पोर्तुगीज राजवटीतही काही सभा व कार्यक्रमांना परवानगी मिळत असे. पण, काल मगोचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रकार घडला. या लोकांनी राजकारण त्यापेक्षाही अत्यंत हीन पातळीवर नेऊन ठेवले आहे. त्याचे हे उदाहरण आहे. असे काल मगो पक्षात प्रवेश केलेले जीत आरोलकर यांनी पेडणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

आरोलकर पुढे म्हणाले की, मांद्रे येथील माझ्या मगो प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतील म्हणून  कार्यक्रमाला परवानगी तर नाकारण्यात आली.सगळीकडे लावण्यात आलेले बावटे वीज खात्याच्या कर्मचाऱ्याना काढण्यास लावले. हे बावटे म्हणजे कुणा सुदिन ढवळीकर किंवा जीत आरोलकरांचे नव्हेत तर ते  भाऊसाहेब बांदोडकरांचे हे त्यांनी लक्षात ठेवावे. सुमारे दोनशे पोलीसांचा बंदोबस्त ठेवला.मी एक माजी पोलीस कर्मचारी माझ्या मगो प्रवेशासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.पण मी काम केलेल्या पोलीस खात्यातील पोलीस वर्गही स्वागता साठी उपस्थित असलेले पाहून मला मनस्वी आनंद झाला.

मागच्या विधानसभा पोट निवडणुकीसाठी मला जास्त वेळ मिळाला नव्हता.मी निवडणूक हरलो तरीही मला मतदाराकडुन मोठा प्रतिसाद मिळाला.त्यांच्याकडून माझ्याबद्दल बऱ्याच अपेक्षा असल्याने मला मतदाराकडुन मोठा प्रतिसाद मिळाला होता.या पोटनिवडणुकीनंतर आमच्या अनेक बैठकी झाल्या.त्यात निवडणूक लढविण्यासाठी एखाद्या चांगल्या पक्ष हा हवाच अशा सूचना आल्या.मगो पक्ष हा आम्हाला  जवळचा. तसेच हा पक्ष भाऊसाहेब बांदोडकर यांचा या मातीत रुजलेला. या पक्षाने कुळ कायदा वगैरे असे  बहुजन समाजासाठी बरेच काही केलेले आहे.मांद्रे मतदारसंघात ठिकठिकाणी फिरताना भाउ साहेब बांदोडकर व सिंहाच्या प्रतिमा पाहून पाया पडणारे भाऊसाहेब व मगो पक्षावर प्रेम करणारे जसे जुने जाणते लोक भेटतात  तशी युवा वर्गही मोठ्या संख्येने मगोकडे येत आहेत. बेकारी ही येथील मुख्य समस्या आहे. 

2016मध्ये इलेक्ट्रॉनिक सिटी सम्मत झाली होती. या प्रकल्पात सुमारे दहा हजार नोकऱ्या उपलब्ध होवू शकतात. विद्यमान आमदाराने पहाणी वगेरे केली. पण, अद्याप काही नाही. या ठिकाणी 99 कोटी रुपयांचे पॉवर स्टेशन होते ते रद्द झाले. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिटीचे काम सुरु होणार नाही. वास्तविक स्थानिक आमदार या नात्याने त्यांनी तो बंद करण्यास विरोध केला पाहिजे होता. आता नवीन निविदा काढण्यात येईल, असे सांगतात. म्हणजे काम किती वर्षांनी सुरु होणार हा मोठा प्रश्न आहे. रोजगारासाठी आमच्याकडे ठोस कार्यक्रम आहे. आमचे  काम सुरू आहे. त्यात  आम्हाला निश्चित यश येईल असे शेवटी जीत आरोलकर म्हणाले.

संबंधित बातम्या