विजेवरील वाहने वापरता येतील, पण...

अवित बगळे
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

सध्या वाढते इंधनाचे दर पाहता विजेवरील वाहन घ्यावे, असा विचार अनेकांच्या मनात येतो. आपल्याकडे असलेल्या पेट्रोलवरील स्कूटरचे रूपांतर विजेवरील करता आले, तर... ही कवी कल्पना नाही तर हे आसगाव येथील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सत्यात उतरवले आहे.

सरकारी अनुदानाची गरज: परवडण्‍याजोग्‍या किमतीही हव्‍यात
पणजी: लुसिड मोटर्सने बॅटरीवर चालणारी कार बाजारात आणली आहे. फुल चार्ज झाल्यानंतर ही कार ८३२ किलोमीटरपर्यंत धावणार आहे. २० मिनिटांत ही कार चार्ज होणार आहे. मात्र, या कारची किमान किंमत ५८ लाख ७५ हजार रुपये आहे. यामुळे विजेवर चालणारी वाहने ही प्रदूषणमुक्त असली तरी त्यांच्या किंमती सर्वसामान्य वाहनांपेक्षा जास्त असल्याने त्यांच्या खरेदीसाठी सरकारी योजनांची गरज निर्माण झाली आहे. अशी वाहने खरेदी केल्यास सरकारने अनुदान दिले, तरच सगळेजण पारंपरिक इंधनावरील वाहनांची खरेदी न करता विजेवर (बॅटरीवर) चालणाऱ्या वाहनांना पसंती देतील.

हा झाला कंपनीच्या पातळीवरील प्रयोग. मात्र, असे प्रयोग स्थानिक पातळीवरही होत असतात. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. सध्या वाढते इंधनाचे दर पाहता विजेवरील वाहन घ्यावे, असा विचार अनेकांच्या मनात येतो. आपल्याकडे असलेल्या पेट्रोलवरील स्कूटरचे रूपांतर विजेवरील करता आले, तर... ही कवी कल्पना नाही तर हे आसगाव येथील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सत्यात उतरवले आहे.

आसगाव येथील आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड डिझाईनच्या मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हे शक्य करून दाखवले आहे. इंधनाची बचत करण्याच्या प्रकल्पावर काम करताना त्यांनी ही निर्मिती साधली आहे. पर्यावरणपूरक अशा वाहनाचा शोध आपण लावल्याचे समाधान त्यांना लाभले आहे. विंसेंट काब्राल, शॉर्विन डिसोझा, नाथानल ब्रागांझा, फ्लेगन फर्नांडिस आणि अनीश प्रभू चांदेलकर या विद्यार्थ्यांनी यावर संशोधन केले. त्यांना प्रा. अमोल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या प्रचलित असलेल्या स्कूटरचे त्यांनी पेट्रोल आणि विजेवर चालणारी स्कूटर असे रूपांतर केले. यासाठी त्यांनी स्कूटरला पाच बॅटऱ्या बसवल्या. त्या चार्ज करण्याची आणि बॅटरीतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर स्कूटरचे इंजिन चालेल याची अभियांत्रिकी शिक्षणाचा उपयोग करून व्यवस्था केली. यातून स्कूटरचालक हवे तेव्हा पेट्रोल आणि हवे तेव्हा विजेवर स्कूटर चालवू शकणार आहे. असे अनेक प्रयोग होतच असतात आणि राहतीलही... 

राज्य सरकार विजेवर (बॅटरीवर) चालणारी वाहने लोकांनी वापरावीत म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना आकाराला आणत आहे. त्याजोगे अशा वाहनांच्या खरेदीनंतर सरकारी अनुदान मिळणार आहे. सध्या अशा वाहनांना रस्ता करात सरकारने सूट दिलेली आहे. विजेवरील वाहनांची गरज आणि त्या क्षेत्रातील हालचाली याचा आढावा घेणारी वृत्तमालिका आजच्या अंकापासून...

(क्रमशः)

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या