मडगाव कोविड इस्पितळात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

कोरोना स्थिती गोव्यात नियंत्रणात येण्यास सुरवात झाली असून मडगाव येथील इएसआय कोविड इस्पितळात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांवरून ९०.१ टक्क्यांवर पोहचले आहे

सासष्टी: कोरोना स्थिती गोव्यात नियंत्रणात येण्यास सुरवात झाली असून मडगाव येथील इएसआय कोविड इस्पितळात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांवरून ९०.१ टक्क्यांवर पोहचले आहे. या इस्पितळात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले असून दिवसाला २ ते ५ कोरोनाग्रस्त रुग्णांना या इस्पितळात दाखल करण्यात येत आहे. या इस्पितळात आतापर्यंत २३२३ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत, अशी माहिती इएसआय कोविड इस्पितळ प्रमुख डॉ. विश्वजित फळदेसाई यांनी दिली. 

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधा महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे गोव्यात आरोग्य सुविधा बळकट करण्यात आली होती तर जिल्हा इस्पितळात कोविडचा प्रभाग सुरू करण्यात आला होता. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सासष्टी तालुक्यातील इएसआय कोविड इस्पितळात २१० खाटांची व्यवस्था करण्यात आली होती, तर कोविड चाचणी करण्यासाठी चार मशीन सुरू करण्यात आले होते. कोविड इस्पितळात सुरवातीला दरदिवशी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या १५ ते ४० होती, पण आज ही संख्या २ ते ५ वर येऊन पोहचली आहे. सध्या कोविड इस्पितळात ४६ रुग्णांवर उपचार सुरू असून यापैकी ९ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपाचर करण्यात येत आहे, असे डॉ.  फळदेसाई यांनी सांगितले.

गोव्यात आधी वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येवर लक्ष केंद्रित करून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू करण्यात आल्याने कोविड इस्पितळावर पडलेला ताण कमी झाला आहे, असे डॉ. फळदेसाई यांनी सांगितले.

या कोविड इस्पितळात आतापर्यंत २५७७ रुग्ण दाखल झल्याची नोंद असून त्यातील २३२३ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत, तर२०९ रुग्णांचे निधन झाले आहे. इस्पितळात ७०० च्या वर प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली असून ३४७ रुग्णांना डायलिसीस करण्यात आले आहे. गोव्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून पर्यटन हंगामाला सुरवात होणार असल्यामुळे नागरिकांनी जानेवारी अखेरपर्यंत तरी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे डॉ. फळदेसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या