मडगावप्रमाणेच म्हापशातील सराफाचाही झाला होता खून

वार्ताहर
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

आठ वर्षांपूर्वीची थरारक घटना, कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नाही

म्हापसा: मडगाव येथील कृष्णा ज्वेलर्स या आस्थापनात झालेला हल्ला व १८ सप्टेंबर २०१२ मध्ये म्हापसा शहरातील मध्यभागी असलेल्या कोचकर इमारतीतील कामाक्षी ज्वेलर्स आस्थापनातील सराफाचा हल्ला करून खून करण्याच्या घटनांमध्ये साम्य दिसत आहे. २०१२ मध्ये भरदिवसा झालेल्या हल्ल्यातून रत्नाकांत रायकर यांचा खून झाला. या घटनेला आठ वर्षे उलटली तरी अद्याप खुन्याचा शोध लावण्यात गुन्हे खात्याला यश आलेले नाही.

गणेशचतुर्थीच्या आदल्यादिवशी म्हणजे १८ सप्टेंबर २०१२ रोजी भरदिवसा कामाक्षी ज्वेलर्समध्ये सहा हल्लेखोरांनी ज्वेलर्समध्ये प्रवेश करून रत्नाकांत रायकर यांच्यावर हल्ला करून २७ वेळा त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर आस्थापनाचे शटर ओढून दुकानातील ३ किलो सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करून पलायन केले होते.

संध्याकाळच्या वेळी खुनाची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर रायकर कुटुंबियांनी धावपळ केली. म्हापसा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर खुनाच्या घटनेचा व चोरीचा पंचनामा केला गेला. चौकशी चालू ठेवली. श्‍वानपथकाने चोरांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर या घटनेचा शोध लावण्यासाठी हे प्रकरण गुन्हे खात्याकडे सोपविण्यात आले. तत्काली क्राईम ब्रॅंचचे अधीक्षक ओमप्रकाश कुडतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने चालू केला गेला.

रत्नाकांत रायकर यांच्या आस्थापनातील हल्ला हा पूर्वनियोजित होता. रायकर यांच्याशी हल्लेखोरांनी वादविवाद केला असावा व त्यानंतर चाकू हल्ला करून त्याचा खून झाला. या सर्व घटनेची माहिती कॉर्पोरेशन बॅंकेच्या कॅमेऱ्यातून काही प्रमाणात पोलिसांना सापडली होती.

क्राईम ब्रॅंचने रायकर यांच्या कुटुंबियांकडून माहिती गोळा केली. तसेच कामाक्षी ज्वेलर्सच्या कारागिराची तपासणी व जबानी घेतली गेली. सुमारे २०० लोकांच्या जबान्या घेतल्या गेल्या. त्यानंतर १८ सप्टेंबर २०१२च्या घटनेनंतर १ वर्ष सात दिवसांनी क्राईम ब्रॅंचने पश्‍चिम बंगालमधून रायकर यांच्या आस्थापनात मागच्या सहा वर्षांपासून कामाला असणारा साईदूल इस्लाम अब्दूल जलील मंडळ या कामगाराला गोव्यात आणले गेले.

संशयित साईदूल मंडळ याने रत्नाकांत रायकर यांच्या खुनानंतर दोन महिन्याच्या आत पश्‍चिम बंगालला पलायन केले होते. त्यामुळे त्याच्यावरील संशय वाढला होता. त्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाकडून त्याला जेरबंद करून चौकशी करण्यात आली. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाला पुढे उभे करण्यात आले. न्यायाधिशांनी त्याला १४ दिवसांचा रिमांड दिला, पण या १४ दिवसांच्या रिमांड काळात गुन्हा अन्वेषण विभागाला ठोस पुरावा हस्तगत करण्यात अपयश आल्यामुळे त्याला जामिन देण्यात आला.

रत्नाकांत रायकर यांची पत्नी, पुत्र व कन्या दुःखात होती. त्यामुळे सुरवातीच्या काळात त्यांच्याकडून पाठपुरावा झाला नाही, पण नंतर तत्कालीन स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे या कुटुंबियांनी पाठपुरावा केला, पण पर्रीकर गृहमंत्री असूनसुध्दा त्यांना न्याय देऊ शकले नाहीत. अनेकवेळा रत्नाकांत रायकर यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच गुन्हा अन्वेषण विभागाच्या पणजी येथील कार्यालयात जाऊन थकले, पण खुनाचा तपास काही लागला नाही. भाजप राजवटीत खुनाचा तपास लवकर लागतो ही भावना रायकर कुटुंबियांची होती, पण या कुटुंबियांना कुणी न्याय देण्याचे सौजन्य दाखवले नाही किंवा या खुनाचा पाठपुरावा करण्यासाठी कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा आशीर्वाद लाभला नाही.

रत्नाकांत रायकर यांची पत्नी रत्नदीपा, पुत्र रायेश्‍वर व कन्या रकंझा या कुटुंबियांनी अनेक प्रयत्न केले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे नंतर रक्षामंत्री म्हणून गेल्यानंतर या कुटुंबियांचे प्रयत्न कुठेतरी थांबले. तरीही रायेश्‍वर रायकर यांनी माहिती हक्क कायद्याखाली पोलिस स्थानकात खुनाच्या तपासाची माहिती मागितली, पण या खुनाच्या तपासाची माहिती गुप्त असल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही असे उत्तर दिले गेले. रायकर कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नाकांत रायकर यांच्या खुनाची एफआयआर अजूनपर्यंत मिळाली नाही.

आम्ही वडिलोपार्जित आमचा हा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून आमच्याकडे सोने असते आम्ही आमचे स्वतःचे आस्‍थापन उघडत सोने प्रदर्शनास ठेवतो. अशा सराफाना आज चोरटे लक्ष करीत आहेत. कुठल्याही सराफावर हल्ला करण्यापूर्वी पूर्वनियोजित कट आखला जातो. या कटात सराफाचा बळी जातो. २०१२ मध्ये कामाक्षी ज्वेलर्सचे मालक रत्नाकांत रायकर व आजच्या घडीला मडगाव कृष्णा ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांचा या हल्लेखोरांनी बळी घेतला आहे. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्हा सराफांना पोलिसांनी कायमस्वरूपी संरक्षण देण्याची गरज आहे तसेच प्रत्येक ज्वेलरीवाल्यांनी आपल्या आस्थापनात कॅमेरे लावण्याची गरज आहे.
दिलीप शिरोडकर, अध्यक्ष गोवा ज्वेलर्स असोसिएशन

गोवा ज्वेलर्स असोसिएशन उत्तर गोवा समितीच्या वतीने अनेक वेळा कामाक्षी ज्वेलर्सचे मालक रत्नाकांत रायकर यांच्या खुनासंदर्भात गुन्हा अन्वेषण विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्याची पत्नी श्रीमती रत्नदीपा यांच्यासमवेत सुध्दा पणजी येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेटून खूनाचा तपास जलद गतीने लावण्याची मागणी केली होती. तसेच त्याच्याकडे असलेल्या साईदुल मंडळ या कामगाराची माहितीसुध्दा दिली होती. फक्त साईदुल मंडळ याला पश्‍चिम बंगालमधून आणून १४ दिवसांचा रिमांड घेतला गेला पण सखोल चौकशी अंती त्याला जामिन मिळाला ही दुःखाची गोष्ट आहे. रायकर यांच्या खुनाची चौकशी पुन्हा जलद गतीने करण्याची मागणी त्यांनी केली.
- धनेश शिरोडकर (माजी सचिव गोवा ज्वेलर्स असोसिएशन उत्तर गोवा)

माझ्या वडिलांवरील हल्ल्याचा व खुनाचा तपास अजूनपर्यंत गुन्हा अन्वेषण विभागाला लावता आला नाही. आम्ही गेली आठ वर्षे या प्रकाराचा पाठपुरावा करीत आहोत. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याकडे आम्ही अनेकवेळा तपास जलद गतीने लावण्याची विनंती केली होती. तसेच २०१६ मध्ये आम्ही लेखी मागणीसुध्दा म्हापसा पोलिसांकडे केली होती. आमच्या वडिलांच्या खुनाचा शोध लवकरात लवकर लावण्याची मागणी आम्ही गुन्हा अन्वेषण विभागाकडे करतो. सामान्य जनतेला सरकारने न्याय देऊन आमचे दुःख हलके करावे.
- रायेश्‍वर रत्नाकांत रायकर

म्हापसा शहरामध्ये आजपर्यंत सहा ते सात ज्वेलर्सवाल्यावर हल्ले झाले आहेत. त्यामध्ये २०१२ मध्ये आमचे सराफ रत्नाकांत रायकर यांचा गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या वस्तीत कामाक्षी ज्वेलर्सचे मालक रत्नाकांत रायकर यांचा खून करून ३ किलो सोने लुटले होते त्याचा तपास गृहखात्याने लवकरात लवकर लावण्याची गरज आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना घडत राहतील. 
हरीष नास्नोडकर (सचिव गोवा ज्वेलर्स असोसिएशन उत्तर गोवा)

संबंधित बातम्या