Madgaon Traffic : मडगावच्या वाहतूक समस्येवर पे पार्किंगचा उतारा?

मडगाव पालिका हद्दीत यामुळे पुढील काही दिवसात पे पार्किंग होण्याची शक्यता वाढली आहे.
Madgaon Parking Issue
Madgaon Parking IssueDainik Gomantak

Madgaon Traffic : मडगावात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. यामुळे सर्वसामान्य मडगावकरांना मात्र नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो. आता या वाहतुक कोंडीवर तोडगा म्हणून पे पार्किंग सुरु करण्याची मागणी स्थानिकांमधून तसंच व्यावसायिकांमधून होताना दिसत आहे. मडगाव पालिका हद्दीत यामुळे पुढील काही दिवसात पे पार्किंग होण्याची शक्यता वाढली आहे.

मडगाव परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये शहरीकरणासोबत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नवीन समस्या उभी ठाकली आहे. सध्याचे रस्ते वाहतुकीवर वाढलेला ताण सहन करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. साहजिकच मडगावात वाहतुकीची कोंडीही नेहमीचीच गोष्ट झालेली आहे. यातच रस्त्याच्या बाजूने पार्क केलेल्या वाहनांमुळे कोंडीत भरच पडत असल्याचं चित्र आहे.

मडगाव शहरात काही बहुमजली इमारती आणि व्यावसायिक आस्थापनं आहेत. ज्यांना पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे याठिकाणी काम करणारे कर्मचारी, तसंच याठिकाणी भेट देणारे यांच्या वाहनांना रस्त्याशेजारी पार्क करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसतो.

Madgaon Parking Issue
Goa Mining: खाणकाम लिलाव होणार आणखी सुलभ

नुकत्याच झालेल्या एका सर्वसाधारण बैठकीत मडगाव पालिका मंडळाने पे पार्किंग सुरु करण्यासंबंधी एक निर्णय पास केला आहे, ज्यात मडगाव हद्दीतील वाहतुकीवरील ताण कमी करणे आणि कुठेही पार्किंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना आळा घालण्यावर चर्चा करण्यात आली. सध्या काही मोक्याच्या जागा हेरुन त्याठिकाणी पे पार्किंग सुरु करण्याचा पालिकेचा विचार आहे. काही इमारतींमध्ये तेथे राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्यांनाच पार्किंगची सोय आहे. त्यामुळे कामानिमित्त भेट देणाऱ्या लोकांना त्याठिकाणी पार्किंग मिळत नाही आणि त्यांना पार्किंग शोधत सर्कलपर्यंत भटकावं लागतं. ज्याचा ताणही साहजिकच शहरातील वाहतूक व्यवस्थेवर येतो.

मडगावातील वाहतूक कोंडीचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मडगाव रेल्वे स्थानकातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये जा सुरु असते. राज्यातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं रेल्वे स्टेशन असल्यामुळे त्याचा ताणही शहरातील वाहतूक व्यवस्थेवर येतो. यासोबतच मडगाव हे शिक्षणाचे हबही मानलं जातं. जवळपास 8000 हून अधिक विद्यार्थी मडगावात शिक्षण घेतात. इतकंच नाही तर महत्त्वाची सरकारी कार्यालयं जसं की आरटीओ, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, जेएफएमसी कोर्ट, जिल्हा आणि सत्र न्यायालय आणि इतर कार्यालयांमुळे लोकांची शहरात नेहमीच ये जा सुरु असते, ज्यामुळे वाहतूक कोंडी वाढतच असल्याचं मडगाव वाहतूक शाखेने पालिकेला सांगितलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com