मडगाव पालिका कर्मचाऱ्यांनी घेतली कोरोनाची धास्ती...

Tukaram Govekar
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

कोरोनाने मडगाव पालिका इमारतीत शिरकाव केला असून कोरोनाची लागण पाच कर्मचाऱ्‍यांना झाल्याने इतर कर्मचाऱ्यांनी कोरोनाची धास्ती घेतली असून ते सध्या पालिकेत कामावर येत नाहीत.

नावेली
शुक्रवारी २, तर सोमवारी ३ मिळून पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पालिकेतील दर एका विभागात केवळ दोन ते तीन कर्मचारी पालिकेत कामावर येत आहेत. शनिवारी संपूर्ण पालिका इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष पुजा नाईक यांनी दिली.
माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी पालिका कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पालिका इमारतीतच करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुरगाव पालिकेने आपल्या संपूर्ण कर्मचारी वर्गाची कोविड चाचणी पालिका इमारतीत केली होती. कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करून येण्यासाठी सांगितल्यास हॉस्पिटलमध्ये कोविड चाचणीसाठी रांगा लागल्या असल्याचे निमित्त सांगून चाचणी करण्यासाठी वेळ काढतील यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन त्यांची चाचणी करावी, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली आहे.
सध्या पालिकेत केवळ १० टक्के कर्मचारी कामावर येत आहेत, बाकी कर्मचारी कोरोनाच्या धास्तीमुळे कामावर येत नाहीत. तसेच पालिकेत कोरोनाने शिरकाव केल्याने पालिकेत आपली कामे घेऊन येणारे लोकही आता येत नसल्याचे दिसून येत आहे.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या