नयनरम्य अंटार्क्टिकाची टपाल तिकिटे बघितलीत का ?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

प्रवास आणि समुद्राचा अभ्यास करताना राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतील माजी संशोधक डॉ. एम. आर. रमेशकुमार यांना हे नजराणे थेट अंटार्क्टिकावर जाऊन १९८६ साली पाहता आणि अनुभवता आले. तेव्हा लागलेले अंटार्क्टिकाच्‍या विलक्षण सौंदर्याचे वेड मनात कायमचे ताजे ठेवण्यासाठी त्यांनी टपाल तिकिटे जमा करण्याच्या त्यांच्या छंदात अंटार्क्टिकावर प्रसिद्ध झालेल्या वेगवगेळ्या देशातील हजारपेक्षा अधिक टपालतिकिटांचा संग्रह केला आहे. 

पणजी : चोहोबाजूला बर्फच बर्फ आणि त्या बर्फातून आरपार जाणाऱ्या किरणांचे नजराणे, विलक्षण शांतता असणारा प्रदेश म्हणजे अंटार्क्टिका. येथे ९० टक्के बर्फच. येथे मनुष्‍यवस्‍ती शक्यता दूरदूरवर नाहीच. चित्रातल्या अंटार्क्टिकाच्या प्रेमात सगळेचजण पडतात. मान्सूनची गतिविधी, प्रवास आणि समुद्राचा अभ्यास करताना राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतील माजी संशोधक डॉ. एम. आर. रमेशकुमार यांना हे नजराणे थेट अंटार्क्टिकावर जाऊन १९८६ साली पाहता आणि अनुभवता आले. तेव्हा लागलेले अंटार्क्टिकाच्‍या विलक्षण सौंदर्याचे वेड मनात कायमचे ताजे ठेवण्यासाठी त्यांनी टपाल तिकिटे जमा करण्याच्या त्यांच्या छंदात अंटार्क्टिकावर प्रसिद्ध झालेल्या वेगवगेळ्या देशातील हजारपेक्षा अधिक टपालतिकिटांचा संग्रह केला आहे. 

या संग्रहासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले असून केरळ राज्यातील जिल्हास्तरीय प्रदर्शनात ही तिकिटे दाखविण्यातही आली आहेत. जेव्हा एखादा देश अंटार्क्टिकावर संशोधन करण्यासाठी जातो, तेव्हा त्या मोहिमेला अंटार्क्टिका एक्सपीडीशन म्हटले जाते. अशा मोहिमांसाठी प्रदर्शित केलेले फोटोमय बुकलेटसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. 

हा संग्रहा जेव्हा जेव्हा सार्वजनिक पातळींवर लोकांना पाहण्यासाठी ठेवला जातो, तेव्हा या माध्यमातून अंटार्क्टिकामध्ये झालेले बदल डॉ. रमेश हे उपस्थितांना समजावून सांगतात. जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिकावरील बर्फ वितळत असून समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. भविष्याचा विचार केला असता ही बाब मानवाला त्रासदायक ठरणार असल्याचे डॉ. रमेशकुमार यांचे मत आहे. हे टाळण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी अंटार्क्टिकावरील सौंदर्य आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी टपालतिकिटांची मदत घेतली असल्याचे ते सांगतात. या तिकिटांमध्ये तेथील सौंदर्य तर पाहायला मिळतेच पण तेथे असणारी जैवविविधता, समुद्री जीव येथे वेगवेगळ्या देशांनी केलेल्या मोहिमांचे फोटो, येथील संशोधन केंद्रे यांच्याशी निगडित तिकिटे आणि शिक्क्यांचाही समावेश आहे. 

संबंधित बातम्या