तूर्त झाले ते झाले आता पुढे वाटचाल करू: मगो

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

पक्षाने येत्या आमसभेनंतर अशा नेत्यांना या साऱ्याची जाणीव करून देण्याचे ठरवले आहे. तूर्त  झाले ते झाले असे मानून मगो मार्गक्रमण करणार आहे.

पणजी: मगोलाही अपेक्षित यश या निवडणुकीत मिळाले नाही. प्रचाराची धुरा आमदार सुदिन ढवळीकर यांनी आपल्याकडे घेतली होती. तरी पक्षाला उत्तर गोव्यात अपेक्षित यश मिळाले नाही. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन काही ठिकाणी बेरजेचे राजकारण केले. ऐनवेळी पाठींबा देणे, घेणे झाले तरी यशाने हुलकावणी दिली. 

असे का झाले याची चाचपणी मगोच्या नेत्यांनी केली आहे. कोणी या निवडणुकीत भूमिका वठवली, कोणी भूमिका वठवण्याचे नाटक केले, याचा शोध घेणे मगोच्या नेत्यांनी सुरू केले आहे. पक्षाने येत्या आमसभेनंतर अशा नेत्यांना या साऱ्याची जाणीव करून देण्याचे ठरवले आहे. तूर्त  झाले ते झाले असे मानून मगो मार्गक्रमण करणार आहे.

चर्चिल नेमके कोणत्‍या गटात?
मगो - काँग्रेसलाच या भाजपच्या घोडदौडीचा फटका बसला असे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले चर्चिल आलेमाव यांच्या डोक्यावर पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार लटकू लागली आहे. 

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दोनवेळा राज्याचा दौरा केला आणि भाजपविरोधात रणनिती आखण्याची तयारी सुरू केली. 
भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार असे चित्र निर्माण झाले. 

असे असतानाही जिल्हा पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला यश मिळाल्यानंतर आलेमाव यांनी उमेदवारासह मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान गाठले आणि त्यांची भेट घेतली. यामुळे आलेमाव कोणत्या गटात अशी चर्चा सुरू झाली आहे. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी घेतली आहे. या घडामोडीची कल्पना पक्षाच्या वरिष्ठांना दिली आहे, असे डिसोझा यांनी नमूद केले आहे.
 

संबंधित बातम्या