
Mahadayi Water Dispute: केवळ म्हादई नदीच नव्हे तर गोव्याच्या अस्तित्वासाठी पेटवलेली ज्योत अखंडपणे पुढे नेतानाच, वेळप्रसंगी कोणताही त्याग करण्याचा वज्रनिर्धार आज सोमवारी विर्डी येथे झालेल्या ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’च्या जाहीर सभेत करण्यात आला.
यावेळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत म्हादईच्या रक्षणार्थ दोन महत्वपूर्ण ठरावही घेण्यात आले. या ठरावांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, शिवसेना, तृणमूल या पक्षांनी पाठिंबा दिला.
केंद्रीय जल आयाेगाने कर्नाटकला दिलेला डीपीआर मागे घ्या, अन्यथा गोवा बंद ठेवण्याचा इशारा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी दिला आणि त्यासाठी सरकारला पंधरा दिवसांची मुदतही दिली.
‘सेव्ह म्हादई’च्या माध्यमातून जनआंदोलन चळवळीस प्रारंभ झाला. जनमत कौलदिनाचे औचित्य साधून आज सोमवारी सायंकाळी विर्डी येथे झालेल्या जाहीर सभेस राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
उन्हाची पर्वा न करता दुपारी तीन वाजल्यापासूनच कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी येत होते. विद्यार्थीही आले होते. ‘आमची म्हादय, आमका जाय’ अशा घोषणा देत वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी सभास्थळी येत होते. आठ हजारांहून अधिक कार्यकर्ते जमले होते. (Mahadayi Bachao Protest)
एकजुटीने लढा देऊया : राजेंद्र केरकर
गोव्याचे अस्तित्व राखून ठेवायचे असल्यास नद्या आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले. सरकारच्या अनास्थेमुळे कर्नाटकने म्हादईचे पाणी केव्हाच वळविले आहे. आता २४ टीएमसी पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
विधानसभेतही याप्रश्नी चर्चा होणे आवश्यक आहे असे सांगून म्हादई परिसर ‘अभयारण्य क्षेत्र’ म्हणून घोषित झाल्यास सर्व प्रश्न सुटतील, असे ते म्हणाले. अभयारण्य म्हणून युनेस्कोने मान्यता दिल्याचा दावा खोटा आहे.
१९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्याचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे. मी प्रत्येकवेळी यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. म्हादईचे रक्षण करायचे असल्यास विर्डी गावातून सुरू झालेली ही चळवळ पुढे नेऊया, वेळप्रसंगी कायदेशीर लढाईचीही तयारी ठेवुया, असे आवाहन केरकर यांनी केले.
नेटके नियोजन, शिस्तीचा प्रत्यय
उन्हाची तमा न बाळगता दुपारी ३ वाजल्यापासून राज्यभरातून लोक उत्स्फूर्तपणे सभास्थळी दाखल.
नगराध्यक्ष राजेश सावळ म्हणाले, खूप दबाव होता म्हणून आमच्याच जागेत सभा पूर्णत्वास आली.
तृणमूलचे नेते कीर्ती आझाद म्हणाले, कौटुंबिक लढा म्हणून याकडे बघा. देशभरातील दिली उदाहरणे.
प्रा. सुभाष वेलिंगकर भाषणासाठी उभे राहताच ख्रिस्ती नागरिकांनी त्यांची हुर्यो उडविली.
साहित्यिक दामोदर मावजो व दत्ता नायक यांनी ऐतिहासिक संदर्भ दिले. मावजोंनी ओपिनियन पोल तर आम्ही शत्रूराष्ट्र पाकिस्तानच्या नद्या शक्य असूनही वळविल्या नाहीत, असे नायक म्हणाले.
वाहतूक व्यवस्था उत्तम होती. सभास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर बसेस उभ्या होत्या. लोक शिस्तीत चालत गेले.
आयोजकांनी दहा हजार उपस्थितीचा दावा केला, तरी प्रत्यक्षात सात हजारांच्या आसपास लोक उपस्थित होते.
दोन महत्त्वपूर्ण ठराव
१) कर्नाटकला दिलेला डीपीआर
मागे घ्यायला लावणे
२) राज्य सरकारने कोणत्याही दबावाखाली न येता म्हादईच्या लढ्यात साथ देणे
...तर राजीनामा देऊ : विजय
म्हादईबाबत सरकार पूर्ण निष्क्रिय ठरले आहे. म्हादईच्या बचावासाठी आंदोलनच नव्हे तर केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी वेळप्रसंगी चाळीसही आमदारांना राजीनामा द्यावा लागला तरी तयारी आहे, असेे विजय सरदेसाई यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.