Mahadayi Water: खरेच, मनोहरभाई असते तर...

Goa: मनोहरभाई असते तर म्हादई वाचली असती, असा दावा भाजपचे माजी प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी केला आहे.
 Manohar Parrikar
Manohar Parrikar Dainik Gomantak

Mahadayi Water: खरे म्हणजे दैनंदिन जीवनात ‘जर असे झाले असते, तर तसे केले असते’ याला काही अर्थ असत नाही. जर मनोहर पर्रीकर हे असते तर म्हादईचे पाणी पेटले नसते. मनोहरभाई म्हादईवर सर्वमान्य योग्य तोडगा काढू शकले असते, या विषयांवर आता समाज माध्यमांवर चर्चा रंगत आहे.

मनोहरभाईंचे चाहते तथा भाजपचे माजी प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी म्हादईवर आलेल्या संकटाला विद्यमान भाजप नेतृत्वाला जबाबदार धरले आहे. मनोहरभाई असते तर म्हादई वाचली असती, असा दावा दत्तप्रसाद करतात. म्हादईबाबत भाईंची कमी सलते, असे त्यांचे म्हणणे आहे. विरोधक मात्र या दाव्यावर सहमत नाहीत.

कारण कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हादईवर धरण उभारण्यासाठी भूमिपूजन केले होते, तेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहरभाई होते.

शिवाय मनोहरभाईंनीच येडियुरप्पा यांना पत्र लिहून दुष्काळग्रस्त जनतेस म्हादईचे पाणी देण्यास हरकत नसल्याचे सांगितले होते. तेच भाई असते तर वेगळे काय झाले असते, असे विरोधक म्हणत आहेत. आता बोला!

राजीनामास्त्र बारगळले

म्हादईसंदर्भात केंद्र सरकारने कर्नाटकला झुकते माप दिल्यास अनेक दिवस उलटून गेले, तरी गोव्यात त्याविरुध्द अपेक्षित आगडोंब उसळलेला दिसून येत नाही. त्यामुळे या प्रकरणात आंदोलनाच्या वल्गना करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.

एवढेच नव्हे, तर या प्रश्नावरून मंत्रिपदाचा त्याग करण्याची घोषणा करणारे श्रीपादभाऊही बोलेनासे झाले आहेत. त्यामुळे केंद्राकडून त्यांना कानपिचक्या मिळाल्या की काय, अशी चर्चा भाजप वर्तुळात रंगत आहे.

इकडे विरोधी पक्षनेते युरीबाब यांनी सर्व चाळीसही आमदारांनी राजीनामा द्यावा, असा प्रस्ताव मांडला खरा; पण कोणीच त्याला प्रतिसाद दिलेला नाही. खुद्द त्यांचे काँग्रेसमधील आमदारही त्याला तयार नाहीत. ते म्हणतात, परत निवडून येण्याची शाश्वती आहे कुठे? म्हणजेच राजीनामास्त्र बारगळल्यातच जमा आहे.

‘आप पाप दिगंबरचेर थाप’

म्हादईचे पाणी जर कुणी वळविले आहे ते भाजप सरकार सत्तेवर असताना नव्हे, तर केंद्रात आणि राज्यात काँग्रेस सरकार असताना, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘गोमन्तक टीव्ही’च्या कार्यक्रमात सांगून त्यांनी काँग्रेसवर पलटवार केलाच; पण हे पाप मी नव्हे, तर दिगंबर कामत यांच्या सरकारने केले आहे, असे आडमार्गाने सुचविलेही.

हे पाणी 2008 ते 2012 या कालावधीत वळविले आहे. त्यावेळी गोवा, कर्नाटक आणि केंद्रात काँग्रेसचेच सरकार होते. तेव्हाच त्यांनी ते कारस्थान उधळून का लावले नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले दिगंबर कामत आता भाजपमध्ये पोहोचले आहेत, याची जाणीव असतानाही मुख्यमंत्र्यांनी ही कोपरखळी मारलीच!

सरदेसाईंनाही कानपिचक्या

म्हादई प्रश्नावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोण जास्त घेरत असतील तर ते गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे. डॉ. सावंत यांनी आपल्या आईला विकले, असा आरोप ते सदोदित करतात.

मंगळवारी या प्रश्नावर आक्रमकपणे बाजू मांडताना त्यांनी सरदेसाई यांनाही कानपिचक्या दिल्या. 2008 ते 2012 या कालावधीत विजय हेसुध्दा काँग्रेस पक्षातच होते. त्यावेळी त्यांनी म्हादई वाचविण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत, असा थेट प्रश्न त्यांनी केला. यावर सरदेसाईंचे काही उत्तर आहे का?

...हा तर दुटप्पीपणाच

म्हादई प्रश्नावर गोवा सरकारची विलक्षण कोंडी झाली आहे, हे पदोपदी जाणवत आहे. एरवी वाक्या-वाक्याला डबल इंजिन सरकारचे उदाहरण देणाऱ्या दोतोरांनी म्हादई प्रकरणानंतर हा नादच सोडून दिला आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, म्हादई प्रश्नावर ग्रामपंचायती व नगरपालिकांनी ठराव संमत करून ते पंतप्रधानांना पाठवून द्यावेत, असे आवाहन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे याच पंचायती वा नगरपालिका जेव्हा मनोरे, जेटी, सागरमाला योजना वा दुहेरी रेल्वेमार्ग यासारख्या प्रकल्पांना विरोध करून ठराव घेत होत्या, तेव्हा हेच सरकार त्यांना देशविरोधी मानत होते; पण आता त्यांचीच मदत घ्यावीशी वाटली, यालाच म्हणतात काळाचा महिमा.

सडलेल्या यंत्रणेचे अरण्यरूदन

आठवड्यातून एकदा का होईना कोलवाळ कारागृह येनकेन प्रकारेण चर्चेत असतेच. हाणामारी नित्याचीच आहे. मोबाईल, घातक हत्यारे, ड्रग्स तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था भेदून सुखेनैव आत पोहोचते.

बुधवारच्या छाप्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणा किती सडली आहे, यावर जणू शिक्कामोर्तबच झाले. तुरुंग अधिकाऱ्यांनी अचानक कैद्यांच्या खोल्यांवर टाकलेल्या छाप्यात तब्बल 45 मोबाईल्स तसेच गांजा, चरस सापडला.

यावर उपाय म्हणून कारागृहाच्या प्रमुखपदी सरकारी अधिकाऱ्याची वर्णी लावण्याऐवजी यावेळी सरकारने पोलिस खात्याचे आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज यांची तुरुंग महानिरीक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांनीही काही दिवसांपूर्वी येथील सुरक्षा अधिकाऱ्यांसह संपूर्ण प्रशासनासोबत बैठक घेतली होती.

तसेच गैरप्रकार मुळीच खपवून घेणार नाही, असा सज्जड इशाराही दिला होता. त्यामुळे आता काही प्रमाणात ही परिस्थिती बदलेल, असे आडाखे बांधण्यात आले होते. पण कुठले काय? येथील भ्रष्ट आणि सडलेल्या सुरक्षा यंत्रणेमुळे बुधवारी ड्रग्सचा मोठा साठा हाती आला. या प्रकारामुळे स्वत: बॉस्को जॉर्जही चक्रावले आहेत. आता बोला!

 Manohar Parrikar
Nagarjuna Akkineni: सिने अभिनेते नागार्जुन यांच्या मांद्रे येथील बांधकामाची शनिवारी पाहणी

...तरीही गोव्यात सामसूम

‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’, हे सर्वांनाच माहीत आहे. आताच्या काळातही असे अनेक निरो आपल्या गोव्यात आहेत, असे सांगितले, तर आश्‍चर्य वाटायला नको. म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला केंद्राने मंजुरी देऊन पाच दिवस झाले, तरीही गोव्यात सर्व स्तरांवर ‘सामसूम’ दिसून येत आहे.

ज्यांच्या खांद्यावर जनतेने आपला भार दिला आहे, त्या लोकप्रतिनिधींनी तर या प्रश्‍नावर केवळ तोंडाच्या वाफाच दवडण्यावर भर दिला आहे.

कृतीच्या बाबतीत शून्य. हल्लीच गोव्यात मूूळ धरलेला एकमेव तृणमूल कॉंग्रेस वगळता एकही मोठा राजकीय पक्ष या विषयावर आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरलेला दिसत नाही.

विरोधी कॉंग्रेस पक्षही हातावर हात बांधून राहिला आहे. भाजप तर सत्ताधारी असूनही घोषणाबाजीच्या पुढे काहीही करू शकलेला नाही. ‘आरजी’ केवळ आव्हाने देत आहे. ‘आप’वाल्यांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पण पुढे काय? अशाने म्हादईवरील संकट अधिक गडद होईल आणि एक दिवस आपल्या हाती काहीच उरणार नाही, अशी भीती गोमंतकीय व्यक्त करत आहेत.

...अखेर गंगेत घोडे न्हाले

गेली अनेक वर्षे उद्धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या दक्षिण गोवा कोमुनिदादच्या मडगावातील विशाल इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय कोमुनिदादच्या सदस्यांनी घेतला आहे. पण त्यासाठी त्यांना कमीत कमी चार वर्षे लागली. पण त्याला कारण ठरला तो साबांखामंत्री नीलेशबाब काब्राल यांनी दिलेला सूचक इशारा.

ही इमारत दुरुस्त करणे कोमुनिदादला झेपत नसेल तर त्यांनी ती सरकारच्या स्वाधीन करावी, म्हणजे त्वरित इमारतीचे काम करता येईल, असे त्यांनी म्हटले.

मात्र, कोमुनिदादचे इतकी वर्षे निद्रिस्त असलेले भागधारक खडबडून जागे झाले आणि त्यांनी हा निर्णय घेतला. काही का असेना वा इमारत कोणी का दुरुस्त करेना, मडगावचे भूषण मानल्या जाणाऱ्या या वास्तूला झळाळी येईल हे नक्की, असे मडगावकर म्हणत आहेत. ∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com