गोव्याचे महाराष्ट्र परिचय केंद्र बंद की सुरू? सारे गुलदस्त्यात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

एखादा रुग्ण मृत्युशय्येवर असताना श्वास सुरू आहे का? याची पाहणी सातत्याने केली जाते. तो रुग्ण धड जिवंत आहे, की मरण पावला, याविषयी खात्रीने कोणीच काही बोलत नाही तशी मरणासन्न अवस्था येथील महाराष्ट्र परिचय केंद्राची झाली आहे.

पणजी :  एखादा रुग्ण मृत्युशय्येवर असताना श्वास सुरू आहे का? याची पाहणी सातत्याने केली जाते. तो रुग्ण धड जिवंत आहे, की मरण पावला, याविषयी खात्रीने कोणीच काही बोलत नाही तशी मरणासन्न अवस्था येथील महाराष्ट्र परिचय केंद्राची झाली आहे. हे केंद्र सुरू आहे, की बंद आहे, याविषयी कोणीच काही सांगू शकत नाही. या केंद्रात सध्या एकच लिपिक असून तो कोविड काळात ओरोस (सिंधुदुर्ग) येथील जिल्हा माहिती कार्यालयात सेवा बजावत आहे.

 

या केंद्राच्या वरिष्ठ सहायक संचालकपदी प्रशांत सातपुते यांची नियुक्ती आहे. त्यांच्याकडे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या माहिती अधिकारीपदाचा ताबा आहे. त्यामुळे त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रातच असते. काल ते एका दिवसासाठी गोव्यात येऊन गेले होते. कार्यालयाची इमारत, एक सदनिका आणि वाहनतळ अशी या केंद्राची भाडेतत्त्वावरील का होईना, पण मालमत्ता आहे. यापैकी वाहनतळ हा भारतीय स्टेट बॅंकेच्या विभागीय कार्यालयाला लागून होता. तो आता मोडून पडला आहे. केंद्राकडे तीन वाहने होती, त्यापैकी एकही वाहन आता शिल्लक नसल्याने तो वाहनतळ वापराविना आहे. तेथे अतिक्रमण होण्याची भीती आहे. सध्या कोणीतरी तेथे येता जाता कचरा फेकत असतात.

 

या केंद्राचे कार्यक्रम पूर्वी गावागावात व्हायचे. दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या केंद्राचे नाव आज पन्नाशीकडे झुकलेल्या पिढीच्या तोंडावर सातत्याने असायचे. गोवा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, वैचारीक संबंधात हे केंद्र दुवा ठरले होते. हळूहळू कर्मचारी सेवानिवृत्त होत गेले, नवी भरती झाली नाही आणि केंद्राला उतरती कळा लागली. आता या केंद्रात १९ पदे रिक्त आहेत. मुळात शिपाई नसल्याने या या केंद्राचे कार्यालय आणि वाचनालय उघडले जात नाही. एका दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या जीवावर हे केंद्र  सुरू ठेवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करत आहे. मात्र तो कर्मचारी सध्या ओरोस येथेच असल्याने केंद्र अधिकृतपणे बंद नसतानाही बंद पडल्यातच जमा आहे. त्या कर्मचाऱ्याच्या दिमतीला एखादा  शिपाई दिला तरी निदान वाचनालय सुरू राहू शकते.

 

अधिक वाचा :

‘मोप’ सोबत अंकोला विमानतळाची लागणार स्पर्धा

गोवा मुक्तीदिनापूर्वी पाणी समस्या सोडवा;  पिण्यास पाणी न देता ‘सुके पोहे व गुळ खा’ असा संदेश देण बंद करा: प्रशांत नाईक

नव्या कृषी विधेयकांविरोधात देशातील शेतकऱ्यांना गोव्यातील विरोधी पक्षांचा पाठिंबा 

 

 

संबंधित बातम्या