‘वादळ’ महाराष्ट्रात ‘आनंद’ गोव्‍यात

महाराष्ट्रात घोंगावत असलेल्‍या या राजकीय वादळाचे पडसाद गोव्‍यातही उमटत आहेत.
‘वादळ’ महाराष्ट्रात ‘आनंद’ गोव्‍यात
BJPDainik Gomantak

‘वादळ’ महाराष्ट्रात ‘आनंद’ गोव्‍यात

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशान फडकावून महाराष्ट्र विकास आघाडीला अडचणीत आणले. संख्या बळाविषयी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातून नेमके काय निष्पन्न होणार, हे येणारा काळ ठरवेल. पण, महाराष्ट्रात घोंगावत असलेल्‍या या राजकीय वादळाचे पडसाद गोव्‍यातही उमटत आहेत. याबद्दल सर्वसामन्‍य लोकांमधून उलटसुलट प्रतिक्रिया येत असल्‍या तरी भाजपाच्‍या गोटात मात्र कमालीचा उत्‍साह दिसून येत आहे. गोवा भाजपच्‍या अनेक नेत्‍यांनी आणि कार्यकर्त्यां‍नी याविषयी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर टाकल्‍या आहेत. अनेकांनी याबद्दल गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीचे सरकार पडणार म्‍हणून अनेकांना आनंदाच्‍या उकळ्या फुटल्‍या असून, काहीजण आपला मेसेज फडणवीस यांच्‍यापर्यंत कसा पोहोचेल याचीही काळजी घेत आहेत. ∙∙∙

(Maharashtra Politics Impact On Goa)

BJP
बलात्कार आणि खूनप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या विकटसाठी ड्रग्सचा पुरवठा

चार आठवड्यांची मुदत

मडगावातील गटारे व नाल्यातून वाहत सायपे तळे व साळ नदीत जाणारे मलमूत्र, सांडपाणी बंद करण्यासाठी न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली. संबंधित यंत्रणांनीही ते मान्य करून तसे प्रतिज्ञापत्र सादर केले. पण, आता वेगळीच समस्या उभी ठाकली आहे. शहरातील अनेक बहुमजली इमारती व हॉटेल तसेच व्यापारी आस्थापनांनी मलनिस्सारणच्या जोडण्या घेतलेल्या नाहीत. त्यांना त्यासाठी नोटिसा जरी बजावलेल्या असल्या तरी पावसाळ्यात जोडण्या घेता येणार नसल्याने चार आठवड्यांचे लक्ष्य कसे साध्य करावयाचे असा प्रश्न या यंत्रणासमोर उभा ठाकला आहे. ∙∙∙

अपक्ष आमदार सायलंट मोडमध्ये

विधानसभा निवडणुकीत तीन अपक्ष आमदार निवडून आले होते. तेव्हा ते किंगमेकर ठरणार असून, त्यांना मंत्रिपद मिळणार असे लोकांना वाटत होते. परंतु, तसे काही घडले नाही, उलट एकही अपक्ष आमदार मंत्री झाला नाही. सगळ्यांना महामंडळ घेऊन समाधान मानावे लागले. त्यानंतर अपक्ष आमदारांकडून जास्त आवाज ऐकायला मिळत नाही. मंत्री आणि इतर त्यांच्याद्वारे केली जाणारी विकासकामे सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. मात्र, तिन्ही अपक्ष आमदार सध्या सायलंट मोडमध्ये गेले आहेत. ∙∙∙

दक्षिण गोव्यातील कारनामे

जमीन हडप घोटाळ्याची व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे. इतके दिवस या प्रकरणात मूग गिळून गप्प राहिलेले पक्षही आता मैदानात उतरू लागल्याचे दिसत आहे. पण, मुद्दा तो नाही. कारण पुढे येणारी माहिती पाहिली तर ही प्रकरणे उत्तर गोव्यातील आहेत. मग दक्षिण गोव्यात अशी प्रकरणे घडलीच नाहीत का व घडली नसली तर त्या मागील कारण काय? अशी पृच्छा आता सर्रास होऊ लागली आहे. या घोटाळ्यातील मुख्य संशयित प्रशांत शेट्टी हा मडगावातील म्हणजेच दक्षिण गोव्यातील. मग दक्षिण गोव्यातील जमिनी सोडून तो उत्तर गोव्यात का गेला की, येथील अशी प्रकरणे दडविली गेली आहेत, अशी शंका मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. ∙∙∙

BJP
राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले?

नोकर भरतीची चौकशी कधी?

नगरनियोजनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी जमीन हडपप्रकरणी तपासाला ज्या तऱ्हेने सुरवात केली आहे, त्याचे गोमंतकीयांकडून स्वागतच होत आहे. चांगली गोष्ट आहे. कारण बऱ्याच ठिकाणी फसवणूक करूनच जमिनी लाटल्या आहेत आणि त्यात सरकारी अधिकारीही सामील आहेत हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे अशाप्रकारचा तपास हा व्हायलाच हवा आणि दोषींना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, असे प्रत्येक गोमंतकीयाचे मत आहे. पण, गंमत म्हणजे विश्‍वजीत राणे यांनी जमीन बळकावप्रकरणी कारवाई सुरू केली ती स्वागतार्ह आहे. परंतु मागच्या काळात सरकारी नोकर भरतीत जो घोटाळा झाला आहे, त्याची चौकशी कोण करणार? काँग्रेसवाल्यांनी तशी मागणी केली आहे खरे. पण, आता जर या खोगीर भरतीची चौकशी झाली तर विश्‍वजीतच अधिक अडचणीत येतील. कारण आरोग्य खात्यात तर सत्तरीतीलच लोक अधिक भरती झाले आहेत, आता ही सत्तरीतील नोकर भरती कोणत्या निकषावर झाली बुवा, हे कारण तसे गुलदस्त्यात आहे. त्यामुळेच ही चौकशी झाली तर विश्‍वजीतना तोंड दाबून बुक्याचा मार बसणारच की..! ∙∙∙

काब्राल है तो..!

नगराध्यक्ष होण्यास जास्मीन ब्रागांझा भले कुणाचाही विरोध असो, आपण त्यांना नगराध्यक्ष करणारच असा निर्धार केलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी आपले म्हणणे खरे करून दाखवताना जस्मिमला बिनविरोध निवडून आणले. विरोधी गटातील कोणतरी उभा राहणार आणि त्यांनतर आम्ही क्रॉस मतदान करू, अशी आशा असलेल्या सत्ताधारी गोटातील काही नगरसेवकांचीही त्यामुळे गोची झाली आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे कुडचडेच्या राजकारणात अंतिम शब्द काब्राल यांचाच चालतो. ‘काब्राल है तो सब मुमकीन है..!’ हे स्पष्ट होते. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com