म.गो. पक्षाचे माजी आमदार प्राचार्य विनायक विठ्ठल नाईक यांचे निधन

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 4 मे 2021

म.गो. पक्षाचे थिवी मतदारसंघाचे माजी आमदार, कट्टर मराठीवादी, शिक्षणतज्ज्ञ, सहकार व सामाजिक चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ता प्राचार्य विनायक विठ्ठल नाईक यांचे वयाच्या 80व्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.

म्हापसा : म.गो. पक्षाचे थिवी मतदारसंघाचे माजी आमदार, कट्टर मराठीवादी, शिक्षणतज्ज्ञ, सहकार व सामाजिक चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ता प्राचार्य विनायक विठ्ठल नाईक यांचे वयाच्या 80व्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.
गेल्या आठवड्यात त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. प्राणवायू  खालावल्यामुळे आज सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. आज दुपारी दत्तवाडी-म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीवर त्यांचे पुत्र पराग यांनी त्यांना मंत्राग्नी दिला. कोरोनामुळे स्मशानभूमी परिसरात येऊ नका असा संदेश त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या चाहत्यांना दिला होता.

प्राचार्य विनायक नाईक यांचा जन्म बार्देशमधील पीर्ण या गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पीर्ण येथे झाल्यानंतर हायस्कूल, उच्च माध्यमिक व कॉलेजपर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. ते समाजवादी  नेते होते. मुंबई येथून पुन्हा गोव्यात आल्यानंतर त्यांचे वास्तव्य म्हापसा येथे होते. परंतु, पीर्ण गावाशी त्यांचे संबंध अतिशय जिवाभावाचे होते. पीर्ण ग्रामपंचायतीचे सरपंचपद त्यांनी सुमारे सतरा वर्षे भूषविले. 1989 साली म.गो. पक्षाने त्यांना थिवी मतदारसंघाची उमेदवारी दिली व ते निवडून आले. कोकणीबरोबरच मराठीही गोव्याची राजभाषा झाली पाहिजे म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. कट्टर मराठीवादी असल्यामुळे त्याचे संभाषण मराठी भाषेतून होत असे.

महाराष्ट्राच्या हद्दीतून गोव्यात माघारी धाडली रुग्णवाहिका; कोरोना रुग्णांसह गायब 

पीर्ण ग्रामसेवा सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, पीर्ण येथील शांतादुर्गा हायस्कूलचे संस्थापक सदस्य, पणजी येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी खजिनदार, पीर्ण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष, डॉ. आंबेडकर उच्च  माध्यमिक विद्यालयाचे सचिव, कळंगूट येथील बॅ. नाथ पै मेमोरिअल शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव, कोलवाळ येथील डॉ. आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अशा विविध माध्यमांतून त्यांनी समाजकारणात कार्यभार सांभाळला. वारखंड-पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कूल, कोलवाळ येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल या शैक्षणिक संस्थांचे संस्थापक सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर फोंड्यात निर्बंध शिथिल 

काणकोण ते पेडणेपर्यंत त्यांनी मराठी भाषेसाठी प्रवास करून प्रचारकार्य केले होते. गोव्याच्या प्रत्येक तालुक्यात गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या माध्यमातून गोमंतक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार होता. आगामी काळात होणारे पेडणे तालुक्यातील मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी कित्येक बैठकांना उपस्थित राहत व मार्गदर्शन केले होते. श्री. नाईक यांनी शिक्षण, सामाजिक , साहित्य-संस्कृती क्षेत्रातील कार्य सुरूच ठेवले होते. 1989 साली म.गो. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून नंतर 6,716 मते मिळविली होती. 1994 साली मात्र पराभव झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून दूर राहिले.
 

संबंधित बातम्या