म. गो. चे अध्यक्ष शनिवारी ठरणार ; रत्नकांत म्हार्दोळकरांची माघार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची केंद्रीय समिती नेमण्यासाठी येत्या शनिवारी (ता.१६) मतदान होणार आहे.

पणजी :  महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची केंद्रीय समिती नेमण्यासाठी येत्या शनिवारी (ता.१६) मतदान होणार आहे. रत्नकांत म्हार्दोळकर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सरचिटणीसपदासाठी मतदानच होणार नाही. मागील समितीतील खजिनदार आपा तेली आणि कार्याध्यक्ष ॲड. नारायण सावंत यांची माघार हा विषय आज चर्चत होता. खजिनदारपदी अनंत नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मगोच्या अध्यक्षपदासाठी पांडुरंग ऊर्फ दीपक ढवळीकर आणि नीलेश पटेकर यांच्यात सरळ लढत होणार आहे. मतदान शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत गोमंतक मराठी समाज सभागृहात होणार  आहे.

मगोचे ९९९ सदस्य मतदानासाठी पात्र आहेत. इतर पदांसाठीचे उमेदवार असे कार्याध्यक्ष- प्रताप फडते, हेमंत पिळगावकर, उपाध्यक्ष- अमृत आगरवाडेकर, किशोर परवार, कृष्णनाथ दिवकर, सदस्य - सुदीप कोरगावकर, फ्रांसिस लोबो,  प्रभाकर मुळीक, श्रीपाद येंडे, महेश साटेलकर, नरेश गावडे, महेश पणशीकर, शिवदास गावडे, संदीप वेरेकर, राजू नाईक, चंद्रशेखर खडपकर, अनिल नाईक,  सुभाष पारकर आणि राघोबा गावडे.

मगो निवडणूक स्थगितीस नकार 

\महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या केंद्रीय समितीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी गुरुनाथ नाईक व भारत नाईक यांनी सादर केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे ही निवडणूक येत्या शनिवारी १६ जानेवारीला होणार आहे. पक्षाचे माजी सरचिटणीस लवू मामलेदार यांच्या याचिकेवर येत्या गुरुवारी १४ रोजी सुनावणी होणार आहे.  काही दिवसांपूर्वी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल केला होता व २०१७ साली समितीची मुदत संपूनही तिला मुदतवाढ दिल्याप्रकरणी आवाज उठविला होता. या सदस्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याने त्यांचा निवडणुकीतील मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला आहे. पक्षाची ही कारवाई घटनेनुसार नसल्याचा दावा करून या निवडणुकीला स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली होती.

संबंधित बातम्या