फोंड्यात मगोची गरिबांसाठी ‘फूड बॅंक'

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

फोंड्यात मगो पक्षातर्फे डॉ. केतन भाटीकर यांच्या प्रयत्नांमुळे एकवेळचे जेवण न मिळणाऱ्या गरीब गरजूंसाठी ‘फूड बॅंक’ सुरू करण्यात आली आहे. मगोचे ज्येष्ठ नेते तसेच आमदार सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते या फूड बॅंकेचे उद्‌घाटन करण्यात आले.

फोंडा : फोंड्यात मगो पक्षातर्फे डॉ. केतन भाटीकर यांच्या प्रयत्नांमुळे एकवेळचे जेवण न मिळणाऱ्या गरीब गरजूंसाठी ‘फूड बॅंक’ सुरू करण्यात आली आहे. मगोचे ज्येष्ठ नेते तसेच आमदार सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते या फूड बॅंकेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी केतन भाटीकर, नगरसेवक नगरसेवक व्यंकटेश नाईक, गिताली तळावलीकर, अमिना नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, कुर्टी-खांडेपार उपसरपंच सुधीर राऊत, उद्योजक अभय प्रभू, माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन वेरेकर तसेच इतर आजी माजी नगरसेवक, पंच, जिल्हा पंचायत सदस्य व मगोप्रेमी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सुदिन ढवळीकर यांनी अशाप्रकारच्या उपक्रमामुळे कुणीही उपाशीपोटी झोपणार नसल्याची ग्वाही दिली. केवळ फोंड्यातच नव्हे तर तालुक्‍यात इतर ठिकाणीही अशाप्रकारचा उपक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. फोंड्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच समारंभात शिल्लक राहणारे अन्नय या फूड बॅंकेत राखून ठेवले जाईल व गरजवंतापर्यंत हे अन्न दिले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 
केतन भाटीकर यांनी या उपक्रमासाठी मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांची प्रेरणा मिळाल्याचे सांगून गरिबांसाठी जो एकवेळचे जेवण घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ करून दिला जाईल, असे सांगितले. याकामी सहकार्य केलेल्या उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांचेही त्यांनी आभार मानले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विराज सप्रे यांनी केले. 

रवी नाईक यांचे आरोप निराधार..!
फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी मलनिस्सारण अर्थातच एसटीपी प्रकल्पावरून आपल्यावर नाव न घेता केलेले आरोप निराधार आहेत. रवी नाईक यांना या प्रकल्पासंबंधी पूर्ण माहिती नाही, त्यामुळेच त्यांनी हे आरोप केल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. फोंड्यातील एसटीपी प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याचा प्रश्‍नच येत नसून नियमांनुसार जमीन विकत घेता येते. या प्रकल्पासाठी आवश्‍यक त्या ठिकाणी जमीन विकत घेतली असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. या एसटीपी प्रकल्पासाठी फोंडा पालिका आणि कुर्टी पंचायतीने आधी दाखला देऊन नंतर तो मागे घेतला. या मागे असलेल्या राजकारणात कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले. चौकशीला आपण तयार असून घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांनी समोरासमोर बसावे, असे आव्हानही सुदिन ढवळीकर यांनी दिले.

संबंधित बातम्या