महाशिवरात्री 2021: गोव्यातील देवस्थानांमध्ये अशा पद्धतीने साजरी होणार महाशिवरात्री

महाशिवरात्री 2021: गोव्यातील देवस्थानांमध्ये अशा पद्धतीने साजरी होणार महाशिवरात्री
Mahashivaratri 2021 Mahashivaratri will be celebrated in such a way in the temples of Goa

गोव्यातही महाशिवरात्री अत्यंत उत्साहात व भक्तीभावाने साजरी केली जाते. यावर्षी महाशिवरात्रीवरदेखील कोरोनाचे सावट असल्यामुळे भक्तांना सर्व कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करत महाशिवरात्री साजरी करण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.गोव्यातल्या देवस्थानांमध्ये महाशिवरात्री कशा पद्धतीने साजरी कऱण्यात येणार आहे, ते जाणून घेऊ :

1. नागेश महारुद्र देवस्थान, प्रियोळ 

मागीलवाडा प्रियोळ येथील श्री नागेश महारुद्र देवस्थानात महाशिवरात्र उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होईल. सकाळी धार्मिक विधी होतील. संध्याकाळी 7 वाजता संगीताचा कार्यक्रम होईल यात नितीन ढवळीकर व साथी कलाकार यांचा सांगीतिक कार्यक्रम होईल. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.

2. श्री मंडलेश्‍वर मंदिर, वाजे शिरोडा

वाजे शिरोडा येथील श्री मंडलेश्‍वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव आज विविध कार्यक्रमानिशी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी श्री मंडलेश्‍वर व पंचिष्ट दैवतांना विधिवत अभिषेक पूजा व अन्य धार्मिक विधी होतील त्यानंतर भाविकांच्या हस्ते श्रींच्या उत्सवी लिंगावर अभिषेक व पूजा होणार आहे. दुपारी महाआरती व प्रसाद होईल. रात्री स्थानिक भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होईल.

3. गोविंदनाथ मंदिर, बोरी 

तिशे बोरी येथील श्री गोविंदनाथ मंदिरात आज महाशिवरात्र उत्सव विविध भरगच्च कार्यक्रमानिशी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळपासून श्री गोविंदनाथ मूर्तीस भाविकांकडून अभिषेक, दुपारी महाआरती, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम, आरती व प्रसाद होणार आहे.

4. सप्तकोटेश्वर मंदिर, खांडेपार फोंडा

 खांडेपार येथील प्राचीन मांडवी नदीच्या तीरावर असलेल्या श्री सप्तकोटेश्‍वर मंदिरामध्ये महाशिवरात्र उत्सवानिमित्त  सकाळी अभिषेक व इतर धार्मिक विधी, महापूजा आरती आदी कार्यक्रम पार पडले, तरी भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे. 

5. महादेव मंदिर, संजार बोरी

 झुआरी नदीच्या बांधानजीक संजार येथील कातळावर असलेल्या श्री महादेवाच्या संजार स्वयंभूलिंगावर महाशिवरात्र उत्सव आज विविध भरगच्च कार्यक्रमानिशी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळपासून संजार लिंगावर भाविकांकडून स्वहस्ते अभिषेक,पूजा, अर्चा व दुपारी आरती प्रसाद वाटप होणार आहे.

6. श्री रुद्रेश्वर देवस्थान, हरवळे

गोमंतकातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या डिचोली तालुक्यातील हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानचा वार्षिक महाशिवरात्री उत्सव आज साजरा करण्यात येणार आहे. यंदा महाशिवरात्री उत्सवावर "कोविड" महामारीचे सावट असले, तरी काल बुधवारी सायंकाळपासूनच रुद्रेश्वर देवस्थान परिसरात मंगलमय वातावरण पसरले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त या तीर्थक्षेत्री शिव भक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी देवस्थान आणि अन्य यंत्रणा सज्ज झाली आहे. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता मुक्तद्वार महापर्वणीला सुरुवात होणार आहे. देवस्थानचे अध्यक्ष यशवंत श्रीकांत माडकर यांच्यातर्फे अभिषेक करण्यात आल्यानंतर समस्त भाविकातर्फे श्रींच्या लिंगावर स्वहस्ते रुद्रभिषेकास सुरुवात होईल. मुक्तद्वाराचा लाभ संध्याकाळी पावणेआठ वाजेपर्यंत घेता येईल. नंतर साफसफाईसाठी एक तासासाठी देऊळ बंद ठेवले जाईल. रात्री नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे ठीक 12 वा. महाआरती व वाजत गाजत पालखी मिरवणूक आणि वरचे हरवळे येथून देवीचे आगमन, तदनंतर वरदहस्त क्रिएशन प्रस्तुत आणि विशाल गावस निर्मित "मामा गेलो तेल लायत" हे दोन अंकी कोकणी नाटक सादर होणार आहे. शुक्रवारी  पहाटे 6 वा. दिवजोत्सव तदनंतर विजयरथातुन वाजत गाजत श्रींची रथ मिरवणूक व पावणी होणार आहे. 10:30वा. दत्तराज राजेंद्र नाईक यांच्या यजमान पदाखाली देवस्थानतर्फे अर्चशुद्धी आदी धार्मिक विधी होणार आहे. दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. "कोविड"महामारीमुळे भाविकांनी मार्गदर्शक नियमांचे पालन करून स्वतःची खबरदारी स्वतः घ्यावी. असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे. . डिचोलीत महाशिवरात्री! दरम्यान, डिचोलीतील नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर, लिंगाची कोंड येथील श्री लिंगेश्वर, श्री वाठादेव आदी विविध ठिकाणच्या देवस्थानात महाशिवरात्री उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

7. दामोदर मंदिर, दाबोळी

कोरोना महामारीचे सावट अजूनही राज्यामध्ये असल्याने येथील श्री दामोदर मंदिरामध्ये यंदा महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन होणार नसल्याचे श्री दामोदर भजनी सप्ताह समितीने कळविले आहे. मंदिरात कुठल्याही प्रकारचे धार्मिक विधी होणार नसून भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर खुले राहणार आहे. तसेच त्या दिवशी लिंगावर अभिषेकाचा कार्यक्रम होणार नसल्याने दूध वगैरे घेऊन मंदिरामध्ये प्रवेश करू नये, असे समितीने कळविले आहे. मंदिरामध्ये येऊन दर्शन घेताना सॅनिटायझरचा वापर, मास्क वापरणे व सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन समितीने पत्रकामध्ये केले आहे.

8. श्री शंकर देवस्थान, शंकरवाडी पणजी 

शंकरवाडी - ताळगाव येथील श्री शंकर देवस्थानात 11 व 12 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज पहाटे 5:30 वाजल्यापासून भाविकांकडून श्रीस अभिषेक (पाण्याचा) संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू राहील. कोरोना महामारीमुळे यंदा दुधाचा अभिषेक होणार नाही. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता स्थानिक कलाकारांतर्फे भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर संध्यकाळी 7 वाजता स्थानिक सुवासिनींकडून दीपोत्सवाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पालखी मिरवणूक, आरती व तीर्थप्रसाद होईल. शुक्रवार 12 मार्च रोजी सकाळी श्रीस अभिषेक, दुपारी 4 वाजता श्री सत्यनारायण पूजा होईल. रात्री 9 वाजता फळांची पावणी व रात्री 10 वाजता कला चेतना वळवई निर्मित आणि राजदीप नायक प्रस्तुत कोकणी विनोदी नाटक ‘फॅमिली एक्स्प्रेस’ सादर होईल. कोरोना महामारीमुळे सर्वांनी मास्क परिधान करून व सुरक्षित अंतर राखून मंदिरात प्रवेश करावा, असे शंकरवाडी - ताळगाव श्री शंकर देवस्थान कमिटीने कळविले आहे.

(सदर लेखात वापरलेली छायाचित्रे प्रतिकात्मक आहेत)

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com