प्रभूनगर - फोंड्यात दरड कोसळली

प्रतिनिधी
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

ढवळीत कारचे नुकसान, रस्ते वीजवाहिन्यांवर झाडे कोसळण्याचे प्रकार

फोंडा:  जोरदार पावसामुळे फोंडा तालुक्‍यात विविध ठिकाणी पडझड झाली. काल रात्रीपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे फोंडा तालुक्‍यातील नदी, नाले, ओहळ तसेच शेती पाण्याने भरली होती. दुपारी पावसाने थोडी उसंत घेतली. दरम्यान, प्रभूनगर - फोंडा भागात इमारतीलगत दरड कोसळली तर ढवळी येथे एका कारवर झाड कोसळल्याने कारचे नुकसान झाले. 

फोंड्यात गेले काही दिवस पाऊस सुरूच आहे. अधूनमधून विश्रांती घेत असला तरी वादळी वारे व पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. काल रात्रीपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी तुडुंब भरले होते. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने हे पाणी ओसरले. मात्र सहा ठिकाणी झाडांची पडझड झाली. त्यात काही ठिकाणी रस्त्यावर तर काही ठिकाणी वीजवाहिन्या व एका ठिकाणी कारवर झाड कोसळले. 

फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी विविध ठिकाणी कोसळलेली झाडे हटवली. तुटलेल्या वीजवाहिन्या दुरुस्त करून वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. तरीपण वादळी वाऱ्यामुळे खंडित वीजपुरवठ्याची समस्या नागरिकांना सतावत होती. 

प्रभूनगर - फोंडा भागात एका इमारतीलगत असलेली दरड कोसळली. या दरडीमुळे लगतच्या इमारतीला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी आमदार रवी नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी संबंधितांना त्यांनी सूचना केल्या.

ढवळी येथे टिपटॉप हॉटेलजवळ एका कारवर अशोक वृक्ष कोसळल्याने कारचे सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून कुणाला इजा झाली नाही. दोन दिवसांपूर्वी महालक्ष्मी - बांदोड्यातही अशाचप्रकारे रस्त्याच्या कडेचे एक झाड कोसळून एका कारसह दोन दुचाकींचे नुकसान झाले होते. यावेळी स्थानिक पंच वामन नाईक तसेच सरपंच रामचंद्र नाईक यांनी धाव घेऊन झाड हटवण्यास अग्निशामक दलाला सहकार्य केले होते. 

फोंडा तालुक्‍यात पावसामुळे सातत्याने पडझड सुरूच आहे. काल फोंडा, कुर्टीसह बोरी, शिरोडा, प्रियोळ, मडकई, माशेल, बेतोडा, तिस्क - उसगाव व इतर काही ठिकाणी झाडे कोसळली. फोंडा तसेच कुंडई अग्निशामक दलाने विविध ठिकाणी धाव घेऊन रस्ते मोकळे केले.  

संबंधित बातम्या