फोंड्यात गणेश मूर्तींसह मखरेही उपलब्ध

Narendra tari
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

गणेशचतुर्थीचा सण आता चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. एरव्ही गणेश चतुर्थी म्हटल्यावर गोमंतकीयांचा उत्साह ओसंडून वाहतो, पण यंदा कोरोनाचे सावट राज्यातील या सर्वात मोठ्या उत्सवावर पडले आहे, तरीपण गणेश भक्त आपल्या लाडक्‍या दैवताच्या आगमनासाठी उत्सुक असून कोरोनाचा धोका टाळूनच सध्या खरेदी सुरू आहे.

फोंडा

गणेशचतुर्थीचा सण आता चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. एरव्ही गणेश चतुर्थी म्हटल्यावर गोमंतकीयांचा उत्साह ओसंडून वाहतो, पण यंदा कोरोनाचे सावट राज्यातील या सर्वात मोठ्या उत्सवावर पडले आहे, तरीपण गणेश भक्त आपल्या लाडक्‍या दैवताच्या आगमनासाठी उत्सुक असून कोरोनाचा धोका टाळूनच सध्या खरेदी सुरू आहे. फोंड्यात चतुर्थीच्या सामानाची रेलचेल सुरू झाली असून गणेश मूर्तींबरोबरच आकर्षक पर्यावरणपूरक मखरेही बाजारात दिसत आहेत. तिस्क - फोंड्यात सरस्वती देवालयाजवळ आकर्षक गणेश मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत, पर्यावरणपूरक तसेच हाताळण्यासाठी सुयोग्य अशी मखरे दादा वैद्य चौकाजवळील पूर्वीच्या शानबाग हॉटेलच्या वास्तूत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
फोंड्यात चतुर्थीच्या सामानाची खरेदी करण्यासाठी एरव्ही मोठी गर्दी असायची. आताही लोकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे, मात्र बहुतांश लोक सामाजिक अंतर राखण्याबरोबरच मास्क व सॅनिटायझेशनचा वापर करून खरेदी करीत आहेत. फोंड्यातील सर्वांत मोठे खरेदी आस्थापन असलेल्या गोवा बागायतदारमध्ये खरेदीसाठी यंदा कडक नियमांचे पालन करण्यात येत आहे. याशिवाय फोंड्यातील अन्य कडधान्य, कपडे तसेच वीज उपकरणे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानातही सॅनिटायझेशन करूनच खरेदीसाठी पसंती देण्यात येत आहे.
फोंड्यात विविध ठिकाणी सुबक सुंदर गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रास्त दरात या गणेश मूर्ती उपलब्ध असून तिस्क - फोंड्यात सरस्वती देवालयाजवळील इमारतीत आकर्षक गणेश मूर्ती खरेदीसाठी ग्राहक गुरुदास चावडीकर यांच्याकडे नोंदणी करीत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीत पर्यावरणाला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. फोंड्यात मध्यवर्ती ठिकाणी त्रिपूर चोडणकर यांनी दरवर्षीप्रमाणे पर्यावरणपूरक अशी सुबक सुंदर रास्त भावात मखरे उपलब्ध केली असल्याने ग्राहकही ही मखरे पाहण्यासाठी मिनिनो हॉटेल शेजारील शानबागमध्ये भेट देत आहेत.
चतुर्थीचे विविध सामान खरेदीसाठी सध्या तरी लोकांची बाजारात तेवढी गर्दी नाही, मात्र चतुर्थीच्या आधी दोन दिवस खरेदीसाठी गर्दी होण्याचा धोका आहे, तरीपण प्रशासनाने कोरोनाबाबत लोकांना जागृत केल्याने लोक आवश्‍यक खबरदारी घेतील, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

चतुर्थी हा गोमंतकीयांचा आवडता सण. आज पर्यावरणाला मोठे महत्त्व आहे, त्यामुळे चतुर्थीसाठी गणेश मूर्तीच्या आराशीसाठी पर्यावरणपूरक मखरे हवीतच. पर्यावरण रक्षण म्हणजे निसर्गाचे रक्षण, आणि निसर्गाचे रक्षण म्हणजेच मानवतेचे रक्षण आहे.
- त्रिपूर चोडणकर (फोंडा)

संबंधित बातम्या