कोलवाळ कारागृहातून कैदी फरार; महिन्याभरातील दुसरी घटना 

प्रतिनिधी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून आज पहाटे बलात्कारप्रकरणातील कच्चा कैदी रामचंद्र यल्लाप्पा याने पलायन केले. त्याच्या या पलायनमुळे कारागृहाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

पणजी - कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून आज पहाटे बलात्कारप्रकरणातील कच्चा कैदी रामचंद्र यल्लाप्पा याने पलायन केले. त्याच्या या पलायनमुळे कारागृहाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. यापूर्वीही त्याने न्यायालयातील शौचालचाचे ग्रिल्स वाकवून पलायन केले होते. गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या २५ ऑगस्टला हेमराज भारद्वाज हा कच्चा कैदी पळाला होता. अजूनही तो सापडलेला नाही. 

कैदी रामचंद्र यल्लाप्पा याच्याविरुद्ध मडगाव येथील न्यायालयात विदेशी महिलेवरील बलात्कारप्रकरणी खटला सुरू आहे. त्याच्यावर चोरीचा गुन्हा पेडणे पोलिस स्थानकात नोंद आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला कारागृहातील स्वयंपाकाचे काम देण्यात आले होते. आज सकाळी १० वाजता कैद्यांची मोजणी करण्यात आली तेव्हा तो सापडला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध करण्यात आली तरी तो कारागृहात नसल्याचे आढळून आल्यावर म्हापसा पोलिस स्थानकात तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली आहे. सकाळपासून त्याचा शोध घेण्यात येत असून तो सापडला नाही तर पलायन केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती कारागृहाचे अतिरिक्त महानिरीक्षक आशुतोष आपटे यांनी दिली.

कैदी रामचंद्र यल्लाप्पा हा कारागृहाच्या स्वयंपाक खोलीत कामाला होता व इतरांबरोबरच तो तेथेच झोपत होता. कारागृहाच्या सभोवती दोन संरक्षण भिंती आहेत. एक संरक्षक भिंत पाच मीटर उंचीची तर त्याच्या बाहेरील संरक्षक भिंत सुमारे १२ मीटर उंच आहे. त्यामुळे तो आतील भिंतीवरून चढून बाहेर गेला असावा. आतील व बाहेरील संरक्षक भिंतीच्या जागेतून कारागृहाच्या मुख्य प्रवेशाद्वारापर्यंत जाता येते. त्याचा फायदा उठवून तो तेथेपर्यंत गेला असण्याची शक्यता आहे. आज सकाळी मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याने छत्रीचा आधार घेऊन या प्रवेशद्वारातून आयआरबी पोलिसांच्या देखत गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

या पोलिसांना तो गृहरक्षक असल्याचे वाटल्याने त्याकडे लक्ष दिले नसावे, असे मत अधिकाऱ्याने व्यक्त केले. 

दरम्यान, या कारागृहाच्या सभोवती तीन टेहळणी मनोरे (वॉच टॉवर्स) आहेत व तेथे शस्त्रधारी पोलिचौवीस तास सतत सतर्क असतात. प्रत्येक दोन तासाने या पोलिसांची ड्युटी बदलत असते. एकावेळी दोघेजण एका टेहळणी मनोऱ्यावर असतात. त्यामुळे कैदी रामचंद्र यल्लाप्पा याने पलायन केले त्यामुळे कारागृहाचे जेलर तसेच इतर तुरुंग कर्मचारी बुचकळ्यात पडले आहेत. 

संबंधित बातम्या