परप्रांतीयांनी कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करावा : लोबो

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

गुन्हेगार कुठलाही असो त्याला हुडकून काढीत त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यास स्थानिक पोलिस यंत्रणा सक्षम असल्याचे मत कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री यांनी मायकल लोबो यांनी व्यक्त केले.  

 शिवोली : कळंगुट असो अथवा गोव्याचा अन्य कुठल्याही भागात व्यवसायासाठी सर्वप्रथम प्राधान्य हे स्थानिकांसाठीच आहे. परप्रांतीयांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करीत आपापला व्यवसाय सांभाळावा, स्थानिकांना त्रास करण्याचा प्रयत्न झाल्यास सरकार तो कदापी सहन करणार नाही. गुन्हेगार कुठलाही असो त्याला हुडकून काढीत त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यास स्थानिक पोलिस यंत्रणा सक्षम असल्याचे मत कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री यांनी मायकल लोबो यांनी व्यक्त केले.  

कळंगुटातील सौझा लोबो कुटुंबियांच्या मालकीचे जुने रेस्टॉरंट पोर्तुगीज काळापासून या भागात कार्यरत आहे. सौझा लोबो कुटुंबियांकडून या परिसरात बार आणि रेस्टॉरंट समुद्राच्या तोंडावर स्थानिक जनता तसेच त्याकाळच्या गर्भश्रीमंत भाटकार लोकांच्या सोयीसाठी  उभारण्यात आले होते. दरम्यान, दिल्लीस्थित एका व्‍यावसायिकाने अलीकडे लोबो यांच्या रेस्टॉरंट शेजारी स्वत:चा रेस्टॉरंट व्यवसाय सुरू केला आहे. दरम्यान, तेथील फुटपाथच्या जागेवरून वाद निर्माण झाल्याने सौझा लोबो यांचे वंशज असलेल्या ज्युड लोबो आणि दिल्लीस्‍थित व्यावसायिक यांच्‍यात वाद निर्माण झाला. त्‍यादरम्‍यान हॉटेल व्यावसायिकाकडून लोबो कुटुंबियांना धमक्या देण्यात आलेल्या होत्या, असे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. 

रविवारी पहाटे झाली हॉटेलची मोडतोड
सोमवारी पहाटे दिल्लीतील एका हॉटेल व्‍यावसायिकाने पन्नासेक बाऊन्सरच्या मदतीने पूर्ववैमनस्यातून ज्युड लोबो यांच्या रेस्टॉरंटची मोडतोड करून नुकसान केले. त्‍या पार्श्वभूमीवर स्थानिक पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री लोबो बोलत होते. सौझा लोबो कुटुंबीयांच्या मालकीच्‍या रेस्टॉरंटची मोडतोड केल्‍यानंतर सोमवारी कळंगुट पोलिसांत त्‍याबाबतची रितसर तक्रार दाखल करून सुद्धा गुन्हेगारांवर अद्याप कारवाई करण्यात पोलिस अपयशी ठरल्याचा आरोप सौझा लोबो यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला. 

संबंधित बातम्या