Manohar International Airport: ...तर झुआरीची पुनरावृत्ती पर्वरीतही होईल?

Manohar International Airport: मोपाचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होताच पर्वरीमध्ये हीच कथित स्थिती वारंवार उद्‌भवणार आहे.
Porvorim | Manohar International Airport | Mopa International Airport
Porvorim | Manohar International Airport | Mopa International Airport Dainik Gomantak

Porvorim: झुआरी पूल पूर्णत्वास येऊन वाहतुकीस खुला होईपर्यंत वाहनचालकांना भरपूर मनस्ताप सहन करावा लागला होता. हा एक ट्रेलर होता. आता अशाच कोंडीची पुनरावृत्ती येणाऱ्या काळात पर्वरीमध्ये पाहायला मिळू शकते. मोपाचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होताच पर्वरीमध्ये हीच कथित स्थिती वारंवार उद्‌भवणार, असे मत तज्ज्ञ व प्रवाशांचे आहे.

पर्वरीतील नवीन उड्डाण रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी सरकार व अधिकाऱ्यांनी भागधारकांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन केले जात आहे. झुआरी पूल बांधकामाशी संबंधित वाहतूक कोंडी हा गोमंतकीयांसाठी एक वाईट स्वप्नच होते. कारण कोंडीमुळे लोकांना तासन्‌तास ताटकळत थांबावे लागत होते. आणि आता मोपा विमानतळ सुरू होताच पर्वरीमध्ये त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होणार आहे.

रस्त्यांवर वाहतूक मार्शल लावण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. मात्र, आगशीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आम्ही एकतरी वाहतूक मार्शल पाहिला का? अशीच स्थिती पर्वरीत यापुढे निर्माण होईल, असे सुतोवाच गोवा कॅनचे संयोजक रोलंड मार्टिन्स यांनी केले.

सध्या पर्वरी रस्त्यावर दररोज लहानमोठे ट्रॅफिक जॅम होताहेत. वाहतूक कोंडी प्रामुख्याने सुकूर जंक्शनपासून ओ-कोकेरा जंक्शनपर्यंत दिसून येते. जरी हा महामार्ग असला तरी एकच लेन रस्ता आहे. या रस्त्यालगत अनेक कथित अतिक्रमणे आहेत, जी अजूनही काढलेली नाहीत.

या महामार्गावरून अनेक बाजूच्या वाड्यांवरील रस्ते जातात. जे कोंडीत भर घालतात. नियमित कार्यालयात जाणाऱ्यांपासून खरेदीला जाणाऱ्यांपर्यंत अनेक पर्यटक आहेत, ज्यांनी सप्टेंबर 2022 पासून पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर गोव्यास भेट देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे वाहतूक वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते.

Porvorim | Manohar International Airport | Mopa International Airport
Goa Petrol Price : जाणून घ्या गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

दरम्यान, पुलांचे उद्‌घाटन करून प्रश्न सुटणार नाहीत. आपण नवीन समस्यांसाठी तयार असणे आवश्यक आहे. कोणतीही अडचण येणार नाही, असे आम्ही म्हणू शकत नाही. अडथळे दूर व्हावेत म्हणून आम्ही पर्याय शोधण्यास तयार आहोत का? आम्ही योजना तयार करण्यास तयार आहोत का? आपत्ती व्यवस्थापनासह सर्व गोष्टींचा समावेश करणारी कोणतीही योजना आपल्याकडे नाही, असेही मार्टिन्स म्हणतात.

रोलंड मार्टिन्स म्हणतात...

  • उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी व्यापक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करणे आवश्यक. ज्यामध्ये वाहतूक पोलिस, ट्रान्सपोर्ट, साबांखा, पंचायत, केटीसीएल, पर्यटन, केआरसी आणि अग्नीशमन व आपत्कालीन सेवा यामध्ये विविध विभाग सदस्य म्हणून असतील.

  • या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पर्यटन आणि वाहतूक व्यवसायासारख्या खासगी क्षेत्रातील इतर भागधारकांनाही सहभागी करावे.

  • काही रस्ते वापरकर्त्यांना पेडणे आणि थिवी ते जुने गोवा आणि मडगाव रेल्वे स्थानकांपर्यंत रेल्वे लिंक वापरण्याची परवानगी देऊन हा रस्ता वापरण्यापासून कसे वळवायचे याची एक उपाययोजना असावी.

  • सोशल मीडिया, एफएम रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सचा वापर करून रस्त्यावरील रहदारीच्या परिस्थितीबद्दल मिनिट-मिनिट अपडेट असणे आवश्यक.

विशेष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असावी

  • एसी इलेक्ट्रिक बसेसचा वापर करून पणजी-म्हापसा केटीसी शटल सेवेसाठी सार्वजनिक वाहतुकीची पुनर्रचना करणे आवश्यक.

  • म्हापसा शुक्रवार (आठवडी) बाजाराला भेट देणाऱ्यांसाठी विशेष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असावी, जेणेकरून वैयक्तिक वाहने कमी होतील.

  • विकेंड (शनिवार, रविवार) वाहतूक हालचालींवर विशेष लक्ष देणे.

  • उपायांसाठी गिरी, सुकूर, सांगोल्डा, पेन्ह दी फ्रान्स, साल्वादोर दु मुंद आणि पिळर्ण-मार्रा या ग्रामपंचायतींच्या रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन समित्यांना सामील करावे.

  • 926 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या आगामी विशेष ग्रामसभेत वाहतूक व्यवस्थापन विषय विशेष अजेंडा कार्यक्रम बनावा.

  • 10 गोवा विधानसभेच्या 16 जानेवारी रोजी आयोजिलेल्या अधिवेशनात पर्वरी येथील वाहतूक कोंडीच्या विषयावर आणि सर्वसमावेशक वाहतूक व्यवस्थापन योजनेच्या गरजेवर चर्चा होणे गरजेचे.

Porvorim | Manohar International Airport | Mopa International Airport
Goa News : कोपार्डे सत्तरीतील ईसम बेपत्ता; पत्नीसह ट्रकचालकाची पोलिसांत तक्रार

सर्वसमावेशक गतिशीलता योजना हवी

राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असायला हवी होती. राष्ट्रीय महामार्गाला समांतर धावणाऱ्या रेल्वेसारख्या पर्यायांचा विचार कोणीच करत नाही. जेणेकरून रस्त्यांवरील ताण कमी होईल. वाहतूक कोंडीला बायपास करण्यासाठी कोणतेही पर्याय किंवा अनेक मार्ग उपलब्ध नाहीत. सर्वसमावेशक गतिशीलता योजना आखायला हवी, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

बांधकामासाठी अर्थसंकल्प मंजूर

पर्वरीमधील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 4.7 किमी लांबीच्या सहा लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामासाठी अर्थसंकल्प मंजूर झालाय. मात्र, हे काम पूर्ण होण्यास चार ते पाच वर्षे लागू शकतात. ज्यामुळे लोकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी वाहतूक वळविण्यास पर्याय नसेल. झुआरी पुलाच्या कामाबाबतीत जसे झाले होते, तशीच वाहतूक एकाच लेनमधून जावी लागेल.

सिंगल लेन रस्ता

गिरी ते मॉल दी गोवापर्यंत रस्त्यावर अलीकडच्या काळात वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. याचे प्रमुख कारण हे अरुंद रस्ता तोही सिंगल लेन. या महामार्गालगत मोठमोठी खासगी आस्थापने आहेत.

मुळात या आस्थापनांकडून वाहतुकीमधील सुसूत्रता राखण्यासाठी ट्रॅफिक मार्शल तिथे नेमणे गरजेचे. परंतु, हे मार्शल दिसत नाहीत. त्यामुळे कोंडीत भर होते. वाहतूक कोंडी व रस्त्याच्या व्यवस्थापनात सर्वांना सहभागी करून घेण्याची गरज असते. महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्त्यांच्या बाजूने रस्ता सुरक्षा समित्या समाविष्ट करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com