मेळावलीत प्रवेशकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्‍यात

दैनिक गोमन्तक
शनिवार, 9 जानेवारी 2021

आयआयटी प्रकल्‍प विरोधी आंदोलनाची झळ चौथ्या दिवशीही कायम होती. शुक्रवारी सकाळपासून मेळावली गावाबरोबरच गुळेली व खोतोडा ग्रामपंचायतीच्या विविध भागातही पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

मेळावली: आयआयटी प्रकल्‍प विरोधी आंदोलनाची झळ चौथ्या दिवशीही कायम होती. शुक्रवारी सकाळपासून मेळावली गावाबरोबरच गुळेली व खोतोडा ग्रामपंचायतीच्या विविध भागातही पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. आज सकाळच्या सत्रात मुरमुणे, मेळावली भागात नियोजित आंदोलनस्‍थळी लोक बसलेले दिसून आले नाहीत, तर मेळावलीवासीयांनी ज्या ठिकाणी सीमांकन केले जात आहे, तेथील जंगल भागात जाऊन ठाण मांडले. आंदोलनाची धग अद्यापही कायम आहे.  ‘आयआयटी’ आंदोलन प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी कल्‍पेश गावकर या तिसऱ्या व्यक्तीस अटक केली आहे. गुरुवारी दोघांना अटक केली होती. 

दहा संशयित पोलिसांच्‍या ताब्‍यात
मेळावलीवासीयांनी सकाळी रस्त्यावर न बसता नियोजित प्रस्तापित आयआयटी जागेच्या जागेत पहारा देत होते. कोणी सरकारी अधिकारी सर्वेक्षणासाठी येत तर नाहीत ना याची पडताळणी करून घेत होते. मात्र, सीमांकन करण्‍यासाठी अधिकारी फिरकलेच नाहीत. रस्त्यावर सकाळी लोक नसल्याने आज शांतता होती. दरम्यान पोलिसांनी गुळेली, खोतोडा परिसरात दक्षता ठेवून काहीजण मेळावली गावात जात असल्याच्या संशयावरून सुमारे दहाजणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. काल विश्वेश प्रभू यांना अटक केली होती. त्यांनी जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला. त्यावर आता सुनावणी सोमवारी होणार आहे. आज मेळावली परिसरात बाहेरील लोक येऊ नयेत. यासाठी पोलीसांनी रस्त्यावर कडक पहारा ठेवला होता. त्यामुळे आंदोलनाची धग कायम राहिली आहे. आज लोकांनी जंगलात धाव घेऊन ठिय्या मांडला. यावेळी मेळावली व परिसरातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. आज दिवसभर गुळेली येथे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक महेश गडेकर, उपनिरीक्षक प्रणित मांद्रेकर, प्रसाद पाळणी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस फौजफाटा परिस्थितीवर लक्ष ठेवून होता.

संबंधित बातम्या