अनेक युवा नेते भाजपकडे सदानंद शेट तानावडे

अवित बगळे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

रितेश व रॉय नाईक यांचा भाजप प्रवेश विनाअट

पणजी

केवळ रितेश व रॉय नाईक हेच युवा नेते नव्हे, तर राज्यभरातून अनेक युवा नेते भाजपमध्ये येण्यास इच्छूक आहेत. सध्या निवडणुकीचे वातावरण नसतानाही भाजपमध्ये संघटनात्मक आणि समाजासाठी काम करण्याची संधी असल्यानेच हे युवा नेते पक्षाकडे वळत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, रितेश व रॉय यांचा भाजपप्रवेश विनाअट झाला आहे. समाज माध्यमावर मात्र अनेक अटींची चर्चा होते. त्यात काहीच तथ्य नाही. त्यात तथ्य आहे की नाही हेही काही दिवसातच समजणार आहे. कोविड टाळेबंदीनंतरच्या काळात भाजपने आपले संघटनात्मक काम सुरू ठेवले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य पातळीवरून नेते थेट कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. अनेक आभासी सभा घेतल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोविड टाळेबंदी किंवा त्यानंतरच्या काळात संघटनात्मक काळात विस्कळीतपणा आला नाही. जनतेच्या त्या त्या वेळच्या समस्यांत भाजपचे स्थानिक कार्यकर्ते धावून जात आहेत. हे सारे पाहिल्यानंतर युवा नेत्यांना आता भाजपमध्येच आपल्या कामाचे चीज होईल असे वाटते.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले देशासमोरील प्रश्न सोडवले, खंबीर भूमिका घेतली. ती जनमानसाला भावली आहे. त्यामुळे लोकसभेच्या येत्या निवडणुकीतही भाजपलाच जनता भरभरून मतदान करणार आहे. अद्याप त्याला अवकाश आहे. येथील निवडणुकीलाही दीड वर्ष आहे. निवडणुकीचे कोणतेही वातावरण देशात वा राज्यात नाही, पण भाजपमध्ये आपण जावे असे अनेक नेत्यांना वाटते, त्यातही युवा नेत्यांना वाटते हे महत्वाचे आहे. राजकारणात जनता तेच तेच चेहरे पाहत असते. संघटनात्मक काम आणि लोकप्रतिनिधीत्व यात नवे चेहरे आले, तर लोक त्यांना लगेच पसंती देतात. युवा पिढीचा एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन जनतेला भावतो. असे हे नेते भाजपला पसंती देत आहेत. ते येतील संघटनात्मक काम करून स्वतःला सिद्ध करतील, पुढे मागे त्यांचा विचार मग पक्ष उमेदवारीसाठीही करू शकेल. निवडणुकीआधी पक्षात येऊन काम करत सिद्ध करण्याची युवा नेत्यांनी दाखवलेली तयारी त्याचमुळे स्वागतार्ह अशी आहे.

संबंधित बातम्या