म्हापशाच्या भूवापरासंदर्भात शेतकऱ्यांचा नगरपालिका व उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने राज्य सरकारच्या आदेशानुसार भू-वापर नकाशा व भू-वापर रजिस्टर तयार केला आहे. या नकाशात म्हापसा शहराबरोबरच शेजारील गावांचाही समावेश केला आहे.

म्हापसा: म्हापशाचा भू-वापर नकाशा व भू-वापर रजिस्टर यासंदर्भात बोडगेश्वर शेतकरी संघ येत्या आठवड्यात नगरपालिका व बार्देश उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णय आज रविवारी झालेल्या बोडगेश्वर शेतकरी संघाच्या बैठकीत घेण्यात आला.

उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने राज्य सरकारच्या आदेशानुसार भू-वापर नकाशा व भू-वापर रजिस्टर तयार केला आहे. या नकाशात म्हापसा शहराबरोबरच शेजारील गावांचाही समावेश केला आहे. तसेच, म्हापसा येथील पारंपरिक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आल्याने बार्देश तालुक्यातील एक मंत्री, अन्य सहा आमदार व नगरपालिका मंडळ जबाबदार आहे, असा आरोप शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.

म्हापसा येथील देव बोडेश्वर सभागृहात ही बैठक बोडगेश्वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला उत्तर गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय भिके, कामरखाजन शेतकरी संघाचे जॉन लोबो, तसेच उल्हास बर्डे, रामदास शिरोडकर, पांडुरंग किनळेकर, आनंद पांढरे, आलेक्स डिसोझा व इतर मिळून सुमारे पन्नास शेतकरी उपस्थित होते.

संजय बर्डे यांनी या विषयासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती देताना सांगितले, की बार्देशमधील एकमेव मंत्री मायकल लोबो तसेच म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा व तालुक्यातील इतर आमदारांनी भू-वापर नकाशा व भू-वापर रजिस्टर तयार करताना स्थानिक शेकऱ्यांना अंधारात ठेवले. तसेच, या आराखड्यात म्हापसा शहराबरोबरच शेजारील पंचायत क्षेत्रांतील जमिनींचा नकाशात समावेश केला. उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे सोडून नगरपालिका मंडळाशी चर्चा करण्यात मग्न होते. पालिका मंडळाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांना पाणी पुसण्याचे काम केले. आजपर्यंत म्हापशातील कित्येक शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी अनेक विकास प्रकल्पांना देऊन एका परीने त्याग केला आहे. परंतु, त्याचे सोयरसूतक म्हापसा नगरपालिका मंडळाला नाही. या नवीन आराखड्यातून अनेक शेतकऱ्यांची नावे वगळली जात असताना पालिका मंडळ बघ्याची भूमिका घेत आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी सर्वांनी एकसंध राहण्याचे आवाहन संजय बर्डे यांनी केले.

उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके यानी सांगितले, की राज्य सरकार गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचे कारस्थान रचत आहे. भू-वापर नकाशात इतर जमिनींचा समावेश करण्यात आला आहे, तर भू-वापर रजिस्टरमधून शेकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. या कृतीच्या विरोधात बोडगेश्वर शेतकरी संघटनेला न्यायालयात धाव घेण्यासाठी आपणाकडून कायदातज्ज्ञांची मदत दिली जाईल. संघटनेच्‍या या आंदोलनात काँग्रेस पक्ष पूर्ण शक्तीनिशी सहकार्य करणार आहे, असेही श्री. भिके म्हणाले.

कामरखानज शेतकरी संघटनेचे जॉन लोबो म्हणाले, उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरण व म्हापसा नगरपालिका मंडळ सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची नावे भू-वापर रजिस्टरमधून वगळली आहेत. या प्रकरणी आपले राजकीय नेते जबाबदार आहेत. अशा आंदोलनात आम्ही संघटित होऊन लढा देण्याची गरज आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या