म्हापशातील शुक्रवारचा बाजार सलग तिसऱ्यांदा बंद

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

टाळेबंदीपर्यंत आठवड्याचा बाजारावर पालिकेची बंदी

सुदेश आर्लेकर
म्हापसा

पोलिसांच्या सहकार्याने नगरपालिकेने म्हापशाचा शुक्रवारचा बाजार सलग तिसऱ्यांदा बंद पाडला. म्हापसा नगरपालिका मंडळाने घेतलेल्या एकंदर भूमिकेमुळे तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या त्यासंदर्भातील कडक धोरणामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व अन्य कर्मचाऱ्यांनी हा आठवड्याचा बाजार आज बंद पाडला.
टाळेबंदी जारी केलेली असतानाही सामाजिक अंतर राखण्याकडे विक्रेते तसेच ग्राहक दुर्लक्ष करीत असल्याने टाळेबंदी संपेपर्यंत आठवड्याचा बाजार भरू न देण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे. मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा यांनी म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्याशी पत्रव्यवहार करून म्हापशातील दर शुक्रवारचा आठवड्याचा बाजार बंद ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांना केले होते. त्यानुसार आज शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून पोलिस कर्मचारी बाजारपेठेत कार्यरत होते. त्यांच्याकडून विक्रेत्यांना माल विकण्यास मज्जाव करण्यात आल्याने आज शुक्रवारी बाजार भरलाच नाही.
या आठवड्याच्या बाजाराला नेहमीच उत्तर गोव्यातील लोकांची गर्दी उसळत असल्याने तसेच सध्या पावसाळी बेगमी करण्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात लोक बाजारपेठेत येण्याची शक्‍यता गृहीत धरून म्हापसा पालिकेने हा आठवड्याच्या बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शुक्रवारऐवजी अन्य सर्व दिवशी म्हापसा बाजारपेठेत फिरत्या विक्रेत्यांना तसेच पारंपरिक विक्रेत्यांना बसू दिले जाते.
म्हापसा बाजारात तसेच म्हापसा अर्बन बॅंकसमोरील रस्त्यावर हळदोणे बस थांब्याजवळ आज शुक्रवारी पहाटे पाच सहा वाजल्यापासून बार्देश, पेडणे व डिचोली तालुक्‍यातील अनेक व्यापारी तसेच पारंपरिक विक्रेते विक्री करण्यासाठी आले होते. परंतु, ते येण्यापूर्वीच तिथे उपस्थित असलेले पोलिस व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना लागलीच हुसकावून लावले. तो माल बाजारपेठेत उतरवण्यासही मनाई करण्यात आली. त्यामुळे त्या सर्वांना नाइलाजाने माघारी जावे लागले.

संबंधित बातम्या