स्वप्नील वाळके खूनप्रकरणी म्‍हापशात दुकाने बंद ठेवून निषेध

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

स्वप्नील यांनी रक्तबंबाळ अवस्थेत अतुलनीय धाडस दाखवल्याबद्दल त्यांना म्हापसा शहरातील सर्व ज्वेलर्स व कारागिरांनी भावपूर्ण श्रध्दांजली देऊन मानाचा सलाम केला.

म्हापसा: मडगाव येथील कृष्णा ज्वेलर्स या आस्थापनात हल्लेखोर घुसून आस्थापनाचे मालक व दैवज्ञ समाजाचे युवा नेते स्वप्नील वाळके यांचा भरदिवसा खून केल्याच्या निषेधार्थ आज म्हापसा शहरातील सर्व ज्वेलर्सवाल्यांनी आपली आस्थापने बंद ठेवून निषेध नोंदवला. स्वप्नील यांनी रक्तबंबाळ अवस्थेत अतुलनीय धाडस दाखवल्याबद्दल त्यांना म्हापसा शहरातील सर्व ज्वेलर्स व कारागिरांनी भावपूर्ण श्रध्दांजली देऊन मानाचा सलाम केला.

म्हापसा शहरात यापूर्वी अनेक वेळा चोरट्यांनी अनेक ज्वेलर्सच्‍या आस्थापनात घुसून लुटण्याचा प्रयत्न केलाच होता तसेच आठ वर्षांपूर्वी कोचकर इमारतीतील कामाक्षी ज्वेलर्सचे मालक रत्नाकांत रायकर यांचा भरदिवसा खून करून ३ किलो सोने लुटले होते. या खुनाचा तपास अजूनपर्यंत लागला नाही. त्यादृष्टीने गृहखात्याकडे संशयरित्या पाहण्याची वेळ ज्वेलर्सवाल्यांना आली आहे. अशी भावना म्हापशातील ज्वेलर्सवाल्यांची झाली आहे.

स्वप्नील वाळके यांनी हल्लेखोरांशी झुंज देत असताना आपल्या जीवाची पर्वा त्यांनी केली नाही. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी हल्लेखोरांची पाठ सोडली नाही. पण, दैवज्ञ समाजातील युवा नेत्याला मुकलो आहे अशी खंत समाजबांधव करीत आहेत. अनेक म्हापसा शहरातील ज्वेलर्सवाल्यांनी सामाजिक माध्यमातून आपले दुःख व्यक्त केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या