म्हापसा नगराध्यक्ष आश्वासनपूर्तीत अपयशी

Sudesh Arlekar
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

म्हापसावासीयांनी हा विषय सातत्याने लावून धरल्यानंतर ती समस्या आगामी वर्षाच्या गणेशचतुर्थीपूर्वी सोडवण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी गेल्या वर्षीच्या गणेशचतुर्थी उत्सवापूर्वी दिले होते; पण, ते त्या आश्वासनाची पूर्ती करण्यात असमर्थ ठरले,

म्हापसा, : येथील तार नदीवरील गणेशविसर्जन स्थळाबाबत आश्वासनपूर्ती करण्यात म्हापशाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा पूर्णत: अपयशी ठरल्याचा दावा म्हापसा यूथ ग्रुपचे प्रवीण आसोलकर तसेच गौरेश केणी यांनी केला आहे. दरवर्षी म्हापशातील सुमारे चार हजार गणेशमूर्तींचे विसर्जन त्या ठिकाणी होत असते, असेही ते म्हणाले.
गतवर्षी म्हापसावासीयांनी हा विषय सातत्याने लावून धरल्यानंतर ती समस्या आगामी वर्षाच्या गणेशचतुर्थीपूर्वी सोडवण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी गेल्या वर्षीच्या गणेशचतुर्थी उत्सवापूर्वी दिले होते; पण, ते त्या आश्वासनाची पूर्ती करण्यात असमर्थ ठरले, असेही आसोलकर म्हणाले. म्हापसा शहरातील गणेशभक्तांना नाइलाजाने तार नदीतील दुर्गंधीयुक्त प्रदूषित पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागते. गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांचे रक्षण आणि पर्यावरणाचे जतन अशा दोहोंच्या बाबतींत तार नदी प्रदूषणमुक्त करणे गरजेचे आहे व ही जबाबदारी प्रामुख्याने म्हापसा नगरपालिकेची असतानाही त्याकडे कुणीही लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देत नाही, असेही ते पुढे म्हणाले.
म्हापसा यूथ ग्रूपने या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून शासकीय यंत्रणांशी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. म्हापसा नगरपालिका, जलस्रोत खाते, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य संचालक, बंदर कप्तान कार्यालय, म्हापसा नागरी आरोग्य केंद्र इत्यादींशी कित्येकदा पत्रव्यवहार करूनही त्याचा काहीच फायदा झाला नाही, असे संघटनेचे कार्यकर्ता गौरेश केणी म्हणाले.

गेल्या वर्षी यासंदर्भात आश्वासन देनाना रायन ब्रागांझा यांच्यासमवेत संदीप फळारी, रोहन कवळेकर, राजसिंह राणे हे नगरसेवक होते. पण, त्या सर्वांनी जणू म्हापशातील गणेशभक्तांच्या तसेच पर्यावरणप्रेमींच्या भावनांना हरताळ फासलेला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली.
हा विषय निकालात काढण्यासाठी आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासमवेत नोव्हेंबर २०१९ मध्ये बैठक घेण्यात आली होती. नगराध्यक्ष ब्रागांझा यांनी केलेल्या विनंतीनुसार म्हापशातील गणेशभक्तांचे शिष्टमंडळ आमदार जोशुआ डिसोझा यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी झालेल्या त्या बैठकीत सहभागी झाले होते. गणेशभक्तांच्या वतीने प्रवीण आसोलकर, गौरेश केणी, नारायण राठवड यांनी त्या बैठकीस उपस्थित राहून त्यासंदर्भात स्वत:चे विचार मांडले होते. नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, नगरसेवक संदीप फळारी व रोहन कवळेकर यांच्या उपस्थितीत ती बैठक झाली होती. त्याशिवाय, सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते व म्हापसा नगरपालिकेचे अधिकारीही त्या बैठकीस उपस्थित होते. परंतु, त्या बैठकीत ठरल्यानुसार अजूनही कार्यवाही झालेली नाही.

म्हापसा पालिकेने यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तार नदीवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या पाइप्सच्या पुलाच्या ठिकाणी बॉक्स टाइप पुलाची उभारणी करण्याचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येईल, अशा आशयाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे पत्र म्हापसा पालिकेला पाठवले होते. तथापि, ते काम टाळेबंदीमुळे होऊ शकले नाही. असे असले तरी तार नदीच्या साफसफाई संदर्भातील छोटीखानी कामे म्हापसा पालिकेच्या वतीने गणेशचतुर्थीपूर्वी हाती घेण्यात येतील.

- रायन ब्रागांझा, नगराध्यक्ष, म्हापसा

तार नदीच्या विषयासंदर्भात म्हापशातील कुणाही नगरसेवकाने अद्याप उघडपणे आम्हाला पाठिंबा दिलेला नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. म्हापशाचे आमदार हे नव्यानेच राजकारणात आलेले आहेत व त्यामुळे आम्ही त्यांना पूर्णत: दोष देऊ शकत नाही. हे काम करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी पालिका मंडळाची तसेच नगरसेवकांची आहे व त्याबाबत म्हापसा पालिकेचे नगरसेवक असमर्थ ठरले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

- गौरेश केणी, म्हापसा युथ ग्रुप

संबंधित बातम्या