म्हापसा पालिकेने महसूलवाढीसाठी प्रयत्न करावेत : संदीप फळारी

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

पालिकेच्या महसूलवाढीच्या उद्देशाने पूर्णत्वास आलेल्या पालिकेच्या विविध इमारती, दुकाने व स्टॉल्स यांचा लिलाव करावा, असे त्यांनी सूचवले आहे.
म्हापसा पालिका बाजारपेठेत तसेच त्या परिसरातील इमारतींच्या संदर्भात त्यांनी ही सूचना नगराध्यक्षांना केली आहे.

म्हापसा

विद्यमान स्थितीत म्हापसा नगरपालिकेने महसूलवाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदीप फळारी यांनी एका लेखी निवेदनाद्वारे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांना केली आहे.
म्हापसा नगरपालिका मंडळाची बैठक शुक्रवार २९ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार असून त्या अनुषंगाने विविध सूचना करताना श्री. फळारी यांनी निवेदनात नमूद केले आहे, की ‘अन्य विषयांवर अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा’ या विषयाच्या अंतर्गत या विषयावर प्राधान्यक्रमाने चर्चा करावी. पालिकेच्या महसूलवाढीच्या उद्देशाने पूर्णत्वास आलेल्या पालिकेच्या विविध इमारती, दुकाने व स्टॉल्स यांचा लिलाव करावा, असे त्यांनी सूचवले आहे.
म्हापसा पालिका बाजारपेठेत तसेच त्या परिसरातील इमारतींच्या संदर्भात त्यांनी ही सूचना नगराध्यक्षांना केली आहे. म्हापसा अर्बन बॅंक परिसरातील चणे विक्रीच्या स्टॉलच्या वर असलेले स्टॉल्स, टॅक्‍सी स्थानकासमोर ‘आराम सोडा’ लाइनमध्ये वरच्या भागात असलेले स्टॉल्स, मासळी मार्केट परिसरातील पहिल्या मजल्यावर असलेले स्टॉल्स आणि बाजारपेठेतील १०८ स्टॉल्सपैकी शिल्लक राहिलेले स्टॉल्स इत्यादी स्टॉल्सचा पालिका मंडळ यासंदर्भात विचार करू शकते, असेही श्री. फळारी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
हा विषय आपण स्वत: पालिका मंडळाच्या बैठकीत कित्येकदा मांडलेला असल्याने त्या दुकानांचा लिलाव करण्यासंदर्भात आतापर्यंत कोणती पावले उचलण्यात आली आहेत, याचा तपशीलवार अहवाल २९ रोजीच्या बैठकीपूर्वी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती श्री. फळारी यांनी या निवेदनातून केली आहे.

 

 

संबंधित बातम्या