म्हापसा पालिका मंडळाने काहीच केले नाही

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

म्हापसा पालिका निवडणुकीत २०१५ मध्ये भाजपप्रणित आघाडीला जरी निर्विवाद बहुमत मिळाले, तरी या आघाडीच्या मंडळाकडून म्हापसा शहराची काहीच प्रगती झाली नाही. हे पालिका मंडळ सर्व बाजूने अपयशी ठरले आहे, असे टीकात्मक विधान काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी म्हापसा येथील उत्तर गोवा काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

म्हापसा : म्हापसा पालिका निवडणुकीत २०१५ मध्ये भाजपप्रणित आघाडीला जरी निर्विवाद बहुमत मिळाले, तरी या आघाडीच्या मंडळाकडून म्हापसा शहराची काहीच प्रगती झाली नाही. हे पालिका मंडळ सर्व बाजूने अपयशी ठरले आहे, असे टीकात्मक विधान काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी म्हापसा येथील उत्तर गोवा काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी त्यांच्यासमवेत साळगाव गट काँग्रेसचे गटाध्यक्ष भोलानाथ घाडी, माजी नगरसेवक आंतोनिओ अल्वारीस व अहमत शेख उपस्थित होते. 

ते पुढे म्हणाले, की गेल्या ५ वर्षांत पालिका मंडळाने नगरसेवकांची एकत्र पत्रकार परिषद घेतली नाही. माजी आमदार स्व. फ्रान्सिस डिसोझा यांनी आपल्या कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यासाठी १५ चे २० प्रभाग केले आणि ते निवडून येण्यासाठी मतदारांची चुकीची विभागणी केली. आपला पुत्र सहज विजयी व्हावा यासाठीसुद्धा त्यांनी तरतूद केली. २० पैकी १६ नगरसेवक त्यावेळी त्यांच्या गटातील निवडून आले. आतापर्यंतच्या निवड झालेल्या तीन नगराध्यक्षांनी ५ वर्षात म्हापशाच्या विकासासाठी ८० ते ९० कोटी रुपये खर्च केले असे म्हटले आहे. याचाच अर्थ नेमके किती कोटी खर्च झाले ८० की ९० कोटी याचा हिशेब त्यांच्याकडे असल्यास तो पत्रकारांसमोर ठेवायला हवा होता.

भ्रष्टाचाराचे उदाहरणं सांगायचे झाल्यास नगरसेवक फ्रॅन्की कार्व्हालो मार्केट कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांनी मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे आढळल्याने त्यांच्या विरोधात म्हापसेकरांनी पालिकेवर मोर्चा आणून त्यांना पदच्युत करण्याची मागणी केली होती.

विद्यमान मार्केट समितीचे अध्यक्ष सुशांत हरमलकर यांनी करासवाडा येथे हम रस्त्याला लागून बेकायदा जागेत सुपर मार्केट सुरू केले असून अनेक दुकाने उभी करून जागा अडवली आहे. तसेच शहरातील रस्त्यांचे डांबरीकारण व रुंदीकरण करण्याच्या नावाखाली प्रचंड कमाई केली आहे, असा आरोपही विजय भिके यांनी केला. 

त्याचप्रमाणे शहरातील बसस्थानक त्यांच्याकडून तयार झाला नाही, बहुतेक रस्ते खराब झालेले आहेत. कचरा गोळा करण्याचा व कचरा प्रकल्प ही केवळ धूळफेक आहे. शहरातील लोहिया मैदान, गांधी चौक व जवळच्या मेरी क्रॉसचे नूतनीकरण पालिकेच्या पैशातून झाले नाही ते बिल्डरांनी प्रायोजित केलेले प्रकल्प आहेत. कुचेली मैदानाजवळ बांधकाम प्रकल्पाचा परवाना मागे घेतला ही केलेल्या चुकीची दुरुस्ती आहे. येत्या पालिका निवडणुकीत काँग्रेसप्रणित आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवणार असून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची मदत घेतली जाईल. भाजपात घराणेशाही चालू आहे त्यासाठी आमचा विरोध आहे, असेही भिके म्हणाले.

उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सनबर्नचा कार्यक्रम रद्द केल्याचे घोषित केले असले तरी ते केवळ लोकांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी. सनबर्न सुरू करण्याचे त्यांचे अंतर्गत प्रयत्न चालू आहेत. खरे म्हणजे कोरोनाच्या संक्रमण काळात होणाऱ्या या प्रकल्पाला या आधीच विरोध करायला हवा होता. आता काँग्रेसच्या दबावामुळे त्यांना नको असताना हा निर्णय घ्यावा लागला आहे. ३० टक्के कमिशन खाणाऱ्या बाबू आजगावकरांनी पर्यटन पूर्णपणे संपवले आहे, असा आरोपही त्यांनी केला. साळगावचे गटाध्यक्ष भोलानाथ घाडी म्हणाले, की केंद्र सरकारच्या कृषी विधेयकास आमचा पूर्ण विरोध 
आहे.

संबंधित बातम्या